Join us

व्हॉट्सॲप स्टेटसमुळे लाखोंची चोरी उघडकीस, घर कामगार महिलेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 1:48 PM

याप्रकरणी मालकाच्या तक्रारीनंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई : मोलकरणीच्या व्हॉट्सॲपमुळे लाखो रुपयांच्या मुद्देमालाची चोरी उघडकीस आली आहे. हा प्रकार कांदिवली पूर्वेतील समतानगर पोलिसांच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी मालकाच्या तक्रारीनंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

इव्हेंट मॅनेजमेंटचे कंत्राटदार मंदार नारकर (३५) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या घरी यशोदा थापा ही स्वयंपाक, तर रूपाली सिंग ही मुलांना सांभाळणे आणि घरातील साफसफाईचे काम करते. रूपाली हिने तिच्या आई-वडिलांचा घरगुती वाद असून, त्यांच्या फारकतीची केस न्यायालयात सुरू असल्याचे सांगत तिने ७ ऑक्टोबरला काम सोडले. दसऱ्याच्या दिवशी साडी नेण्यासाठी नारकर यांच्या पत्नी श्रीमाया घरी साडी शोधत होत्या. मात्र, ती न सापडल्याने त्यांनी रूपालीकडे फोनद्वारे विचारणा केली. त्यावर तिने साडी इस्त्री करून कपाटात ठेवल्याचे सांगितले. त्याचवेळी सामान आवरताना घरातील वस्तू इतरत्र ठेवल्या गेल्या असाव्यात, असे नारकर यांना वाटले. परंतु, त्या न सापडल्याने त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. 

दागिने, घड्याळे, दोन लाखांची रक्कम गायब- श्रीमाया यांनी १२ ऑक्टोबरला रूपालीच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरील फोटो पाहिले असता तिने त्यांचे घड्याळ आणि ड्रेस घातल्याचे या स्टेटसमध्ये दिसले. - नारकर दाम्पत्याने इतर वस्तूंचा शोध घेतला असता त्याही सापडल्या नाहीत. सीसीटीव्ही चित्रीकरणात ७ ऑक्टोबरला रूपाली त्यांच्या घरातील बॅगमध्ये काही सामान घेऊन जाताना दिसली.- घरातून गायब असलेल्या वस्तूंमध्ये हिरे, कुंदनचे दागिने, महागडी घड्याळे, सन ग्लासेस, साड्या, जीन्स, लहान मुलाची बॅग, मेकअप किट, परफ्युम आणि दोन लाखांची रोख यांचा समावेश असल्याचे नारकर यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसन्यायालय