Join us

Maharashtra Budget Session 2023 :'तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती', आशिष शेलार यांची खळबळजनक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 5:43 PM

मंगेशकर कुटुंबीयांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

मुंबई- भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिला गेलेला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून आघाडी सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, अशी खळबळजनक माहिती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उघड केली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर भाषण करताना आमदार शेलार यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या नावाने महाराष्ट्रात संगीत विद्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली. या विद्यालयाची परवानगीची फाईल त्यावेळी तयार झाली आणि ती तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावले नाही म्हणून कद्रू मनाच्या मुख्यमंत्र्यांनी संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती. त्यानंतर सुदैवाने सरकार बदलले मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि पुन्हा त्या संगीत विद्यालयाला परवानगी देण्यात आली, अशी माहिती आज विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी उघड केली.

दरम्यान, संगीत विद्यालय सुरू केल्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानतानाच आमदार शेलार यांनी आता या विद्यालयाला विद्यापीठाची मान्यता देण्यात यावी, तसेच येथे संगीत लायब्ररी सुरू करण्यात यावी, आंतरराष्ट्रीय दर्जाची वाद्य येथे उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी ही यावेळी केली.

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेलता मंगेशकर