श्रीकांत जाधव/मुंबई :दाभोळकर हत्येप्रकरणात दोषी ठरलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा प्रत्यक्ष सनातनशी संबंध नाही. ते सनातनचे साधक नाहीत. तरी त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याची शकता आहे. त्यांनाही निर्दोष मुक्तेसाठी हिंदू विधीज्ञ उच्च न्यायालयात लढतील असे सनातन संस्थेने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची दिशा भरकटवली, असा आरोपही सनातनने केला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर सनातनची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी शुक्रवारी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला.
न्यायालयाच्या निकालानंतर डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या संदर्भात सनातन संस्थेचे साधक निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशभरात सनातन संस्थेला बदनाम करण्याचे तसेच सनातन हिंदु आतंकवादी ठरविण्याचा अर्बन नक्षलवादी शक्तींचा डाव विफल झाला आहे. या गुन्ह्यात लावलेल्या दहशतवादी कारवायांशी संबंधित युएपीए कायदा ही रद्द ठरवला आहे.
या कायद्याच्या आधारे सनातनला भगवे आतंकवादी ठरविण्याचा डाव उध्वस्त झाला आहे. जे जे हिंदु धर्मासाठी लढतील त्यांच्या मागे हिंदू विधीज्ञ न्यायालयीन लढा देतील. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा प्रत्यक्ष सनातनशी संबंध नाही. पण ते हिदुत्वादी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनाही निर्दोष मुक्तेसाठी हिंदू विधीज्ञ परिषद उच्च न्यायालयात लढा देईल,असेही राजहंस यांनी यावेळी स्पष्ट केले.
ज्या दिवशी डॉ. दाभोळकरांची हत्या झाली होती. त्या दिवशीच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी हिंदुत्त्ववाद्यांचा हात आहे, असे म्हटले होते. त्यामुळे तपासाची दिशा भरकटवण्यात आली. सनातन संस्थेला बदनाम करण्यात आले. त्यांनी आमचे जरी नाव घेतले नसले तरी त्यांना आम्ही जाब विचारू असेही ते म्हणाले.