लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘मितवा’, ‘फुगे’, ‘लाल इश्क’, ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांच्या घरी चोरी झाली आहे. पाइपवरून सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शिरलेला चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.स्वप्ना वाघमारे-जोशी अधेरीमधील सब टीव्हीच्या गल्लीत शबरी रेस्टॉरंटच्या शेजारी असलेल्या विंडसर बी सोसायटीमध्ये राहतात. या सोसायटीत सहाव्या मजल्यावर स्वप्ना यांचा फ्लॅट आहे. २४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या पूर्वी त्यांच्या घरी चोर शिरला, पण मुक्या बोक्याच्या सावधगिरीमुळे चोरी झाल्याचे लगेच निदर्शनास आले.
‘लोकमत’शी बोलताना स्वप्ना म्हणाल्या की, २४ ऑगस्ट रोजी रात्री ३ वाजून १७ मिनिटांनी सहाव्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटमध्ये एक चोर घुसला. हॉलच्या खिडकीची काच सरकवून चोराने घरात प्रवेश केला. माझी आई आजारी असल्याने घरी सीसीटीव्ही लावल्याने आणि बोक्याच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रकार तत्काळ उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.
सोसायटीमध्ये ४२ कॅमेरेस्वप्ना यांच्या सोसायटीमध्ये ४२ कॅमेरे असून, सिक्युरीटी गार्डसही आहेत, तरीही चोराने सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील प्रवेश कसा केला, याचा तपास सुरू आहे. याविरोधात स्वप्ना यांनी आंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. लवकरच चोर पकडला जाईल, असे पोलिसांनी सांगितल्याचे स्वप्ना यांचे म्हणणे आहे.
मुलीच्या पर्समधले सात हजार रुपये चोरले
- स्वप्ना पुढे म्हणाल्या की, घरात प्रवेश केल्यावर चोर किचनमध्ये गेला, देवाच्या खोलीतही गेला, पण काही घेतले नाही. त्याला पाइपवरूनच खाली उतरायचे होते. त्यामुळे कदाचित त्याने जड वस्तू उचलली नसावी. तो कॅशच्या शोधात होता. आईच्या खोलीत डोकावला. केअर टेकर खाली झोपली होती.
- झोपेत ती हलल्याने त्याने लगेच दरवाजा बंद केला. त्यानंतर चोर माझ्या मुलीच्या खोलीत गेला. सुदैवाने माझा होणारा जावई त्यावेळी आमच्या घरीच होता. आम्ही सर्व झोपेत असल्याने काही समजले नाही.
- आमच्या घरी एक मांजर आणि बोका आहे, पण मुलीने एका मुक्या बोक्याला घरी आणले आहे. त्या बोक्याने चोराला पाहिले आणि तो माझ्या जावयाच्या पोटावर जाऊन उड्या मारू लागला. त्यामुळे त्याची झोपमोड झाली आणि चोराला पाहून तो ओरडल्याने चोराने धूम ठोकली.
- जावई चोराच्या मागे पळाला, पण तो ज्या वेगात सहाव्या मजल्यावर चढला होता त्याच वेगात आणि त्याच मार्गाने पुन्हा खाली गेला. त्याने माझ्या मुलीच्या पर्समधले सात हजार रुपये चोरल्याचे स्वप्ना म्हणाल्या.