दक्षिण मुंबईतही वाजली तिसरी घंटा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिला प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:28 AM2023-03-24T11:28:27+5:302023-03-24T11:28:41+5:30
या पहिल्याच प्रयोगास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबई : दक्षिण मुंबईतील नाट्यरसिकांना मुंबई महापालिकेकडून गुढीपाडव्याची भेट म्हणून ७५० आसनी नवे नाट्यगृह मिळाले आहे. ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ असे या नाट्यगृहाचे नाव असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी या नाट्यगृहात पहिला प्रयोग रंगला. या पहिल्याच प्रयोगास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भायखळा पूर्व येथील राणीच्या बागेजवळ ई.एस. पाटणवाला मार्गावर पालिकेचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही वास्तू उभारण्यात आली आहे. रंगभूमीवरील प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, आरामदायक आसने, नाट्यगृहातील प्रत्येक रांगेदरम्यान राखलेली पुरेशी जागा, उंची, नाट्यगृहात असलेल्या सोयी- सुविधा तेथील रंगसंगती यामुळे या वास्तूला देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या वास्तूमध्ये ‘चारचौघी’ या नाटकाचा प्रयोग गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ठेवला होता. या कार्यक्रमाला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, परिमंडळ एकच्या उपायुक्त डॉक्टर संगीता हसनाळे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. आता येथील रसिकांना अन्य नाट्यगृहात जाण्याचा वेळ वाचणार असल्याचे सांगण्यात आले.
कलाकारांकडून आभार
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ या नाटकात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासह मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर या कलाकारांनी भूमिका साकारल्या.
अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे या प्रेक्षक म्हणून उपस्थित आहेत, असे कळल्यानंतर त्यांना रंगमंचावर बोलवून पुष्पगुच्छ देत आभार मानले.
पालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेली वास्तू नाट्यरसिकांना आणि कलाकारांना निश्चितपणे आवडेल.
- आश्विनी भिडे,
अतिरिक्त पालिका आयुक्त