Join us

"एकसष्टी सोहळ्यातून एका लग्नाची तिसरी गोष्ट"; वांद्रे पूर्व न्यू इंग्लिश स्कूलचे १९७६ सालच्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

By मनोहर कुंभेजकर | Published: January 19, 2023 12:07 PM

सगळ्यांसाठी सामुहिकरीत्या 'एकसष्टीसोहळा' व 'पारंपारिक वेशभूषा स्पर्धा' आयोजित केली गेली होती.

मुंबई- वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलचे १९७६ सालच्या बॅचचे चार दिवसीय स्नेहसंमेलन आमचा वर्गमित्र पुष्कराज कोले याच्या वेंगुर्ला येथील "सागर सरिता बीच रिसॉर्ट" येथे अविस्मरणीय ठरले.

स्नेहसंमेलन आणि सामुहिकरीत्या एकसष्टी सोहळा निमित्त होते. त्यासाठी सगळेच नटून थटून आले होते व त्यातूनच अचानक सुचलेली काल्पनिक लग्न सोहळ्याची कल्पना अमलात आणली गेली. शरद ऋतूतील सुरवातीस शैलीमध्ये काल्पनिक लग्न सोहळा आणि नेत्रदीपक कार्यक्रम अगदी अधिक संस्मरणीय आणि हलवून करणे ही एक सुंदर कल्पना सुचणे व ती अमलात आणणे ही खरोखरीच बाब आहे आणि आम्ही ती एनईएस १९७६ बॅचने करून दाखवली. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक होती.

सगळ्यांसाठी सामुहिकरीत्या 'एकसष्टीसोहळा' व 'पारंपारिक वेशभूषा स्पर्धा' आयोजित केली गेली होती. आरती भाटकरने प्रत्येकाला रू.६१ चा हार, कणकेचे ६१ रंगीबेरंगी दिवे व वाती, रत्नागिरीहून पेढे,केक, हळदकुंकू वाण, केशरवेलची सिरप, पेन होल्डर,किचेन कम मोबाईल होल्डर अशा भेट वस्तू दिल्या. बाळकृष्ण कुलकर्णी ने मग, दया शिंदे ने बाटल्या, राजेंद्र कांबळी ने मूगलाडू, किशोर चाळके ने कराची बिस्किटे, श्रद्धा व्यास ने गजरे, मिलिंद मोहड ने रेल्वे तिकिटे, अनुया मोडक ची अवॉर्ड कल्पना त्याला राजीव शेट्ये ने शब्दरूपी नावे देऊन सत्कार केला. तसेच पुष्कराज कोले ने प्रत्येकाच्या नावाचे मग, एनईएस १९७६ गेटटुगेदर २०२२ असे टोप्यांवर, कार्डहोल्डर वर, स्कूल ग्रुप फोटो चुंबकीय, कीचैन, लकी ड्रॉ मध्ये किंग आणि क्वीन् अशी दोन टायटन घड्याळे, अवॉर्ड ट्रॉफी, भरपूर बक्षिसे अशा भेटवस्तू प्रत्येकाला दिल्या.

 एकसष्टीचा सोहळा सर्वाँना ६१ रुपयांचे हार घालून आणि ६१  दिव्यांनी सुवासिनीने औक्षण केले. त्यांनतर हळदीकुंकू समारंभ, अवॉर्ड कार्यक्रम होत असतांना अण्णांनी (वरपिता) आप्पांना (वधुपिता) एकांतात घेत दोघांच्या लग्नाचा विषय काढलाच. आप्पांनी होकार दिला. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. मनातल्या साऱ्या शंका, आशंका, बाजूला सारत वधुवर दोघेही एका पवित्र बंधनात बांधले जाण्यासाठी तयार झाले. वधूने आवडीची जांभळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. नवरीच्या रुपात तिच्या गहूवर्णी वर्णाला सोनेरी लकाकी चढली होती. हातभार बांगड्या, नाकात नथ, कानात डुल, गळ्यात परिधान केलेली आभूषणे, तिचे लाजणे सारेच आज तिच्या रुपावर भाळले होते. राजबिंडा नवरदेव आज राजकुमारासारखाच भासत होता. अम्माला(वरमाता) तर या दिवसाची आतुरता होती.

लग्न सोहळ्यासाठी कुडाळ वरून वेंगुर्ल्यात लग्नस्थळी दोन आलिशान बस भरून पाहुणे आले होते. त्यात वराचे काका चिथाप्पा खास हैद्राबाद वरून, अण्णांचे मित्र फर्नांडो अमेरिकेतून आले होते. तसेच वधूचे मामा, बहीण करवली, टोकणा, आई वडील, आत्या, काकी सर्व मंडळी दोन्ही बाजूंनी हजर होते.लग्न सोहळा उपस्थित साऱ्यांच्या आशीर्वादाने मोहरुन निघाला. लग्नसोहळ्याची प्रचंड कोलादलाची सनई च्या सुर वाजंत्री ने वाजत होती. सात वचने देत, सप्तपदी चालत सात जन्मासाठी दोघं एक झालीत. 'सावधान.... कुर्यात सदा मंगलम सावधान...' भटजीनी शेवटचे मंगलाष्टक म्हटले आणि त्या भव्य दालनात उपस्थित असणाऱ्यांनी वधूवरांवर फुलांच्या अक्षता उधळत साऱ्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला शुभेच्छा दिल्या. रजिस्ट्रार उपस्थित होते. वधूवरांनी प्रतिज्ञा वगैरे उच्चारली. वधूवरांच्या कडून साक्षीदारांनी सह्या केल्या.

कन्यादान करून आप्पांनी वडिलांचे कर्तव्य पार पाडले... ते एकच मोठं स्वप्न असतं प्रत्येक बापाचं... लेकीचा संसार डोळ्यापुढे सजतांना पाहिला की सारंच सुख मिळतं. शेवटी पाठवणीचा क्षण येऊन ठेपला...पाठवणीचा क्षण म्हणजे क्षितिज जणू सुखदुःखाचा... हवंहवसं वाटणारं सुख अन् सोबत विरहाचं दुःखही. वधुमायच्या मिठीत वधू आज मोकळी होत होती. वधुपिताच्या आश्रुंनी ती आज चिंब भिजत होती. तोच नवरदेवानं तिचा हात घट्ट पकडत मी आहे घाबरु नकोस... डोळ्यांनी शाश्वती दिली जणू.

"सून नाही लेक घेऊन जात आहोत.. निःशंक रहा.." आप्पांच्या खांद्यावर हात ठेवत आण्णांनी आप्पांना दिलासा दिला. माहेरच्या आठवणी जपत तिने आपले सुरेख सासर जवळ केले. समर्पणाचा क्षण म्हणजे वादळ जणू संदिग्ध भावनांच... आयुषयभराचा ऊन पावसाचा खेळ मिलनाच्या इंद्रधनुष्यावर येऊन स्थिरावला होता. आत्ता जीवनात फक्त आनंद,उत्साह, सहवास, प्रेम, आपुलकी, काळजी अन् शेवटपर्यंतची शाश्वत सोबत या सात रंगाची उधळण होणार होती. त्या इंद्रधनुष्याच्या कवेत ती सावळी धरा सामावली होती. अशा प्रकारे चार दिवसांच्या जन्मभर पुरतील अशा आठवणींची माळ गुंफत गेली. या आठवणी पुन्हा पुन्हा भेटायला उद्युक्त करतील अशी खात्री बाळगत आम्ही एकमेकांचे निरोप घेतले.