पेंग्विनच्या तीन पिलांना मिळाली नावे; फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा

By सचिन लुंगसे | Published: November 18, 2022 06:51 PM2022-11-18T18:51:26+5:302022-11-18T18:53:29+5:30

फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा अशी पेंग्विनच्या तीन पिलांना नावे मिळाली आहेत.

The three penguin chicks have been named Flash, Bingo and Alexa | पेंग्विनच्या तीन पिलांना मिळाली नावे; फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा

पेंग्विनच्या तीन पिलांना मिळाली नावे; फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा

Next

मुंबई: वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते आज (दिनांक १८ नोव्हेंबर २०२२) प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभात करण्यात आला. एवढेच नव्हे तर पेंग्विच्या तीन नव्या पिलांना फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा अशी नावे बहाल करुन या हीरक महोत्सवाचा समारोपही आणखी गोड करण्यात आला. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वाश्रमीचे व्हिक्टोरिया गार्डन) चे उद्घाटन लेडी कॅथरीन फ्रिअर यांच्या हस्ते दिनांक १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथे करण्यात आले होते. हे उद्यान महानगरपालिकेकडे सुपूर्द झाल्‍यानंतर एक सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेने स्‍वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनसामान्‍यांच्‍या विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱया पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. 

या प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव मागील वर्षभर निरनिराळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यामध्ये, १६० वर्षपूर्तीनिमित्‍त शतकोत्तर हीरक महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण, पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालयात आकर्षक आसने/ बैठक व्यवस्था, विद्यार्थ्‍यांसाठी हेरिटेज वॉक, गांडूळखत विक्री तसेच प्राणिसंग्रहालयाच्‍या विविध समाजमाध्यम (सोशल मीडिया) ॲपचे क्यूआर कोड प्रदर्शन यासारख्या काही उपक्रमांचा उल्लेख करता येईल. 


या शतकोत्‍तर हीरक महोत्‍सवाचा सांगता समारंभ आज ( १८ नोव्‍हेंबर २०२२) प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी प्रेक्षागृहामधे संपन्न झाला. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपआयुक्‍त (उद्याने) श्री. किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी आणि इतर मान्‍यवर यावेळी उपस्थित होते. या सांगता समारंभामध्‍ये विविध उपक्रम संपन्न झाले.


अ) ऑनलाईन तिकिट यंत्रणा - प्राणिसंग्रहालयामध्ये प्रवेशासाठी तिकिट रांग न लावता घरबसल्‍या ऑनलाईन पद्धतीने तिकिट घेता यावे याकरिता ऑनलाईन तिकिट प्रणालीचे लोकार्पण करण्‍यात आले. त्‍यादृष्‍टीने पर्यटकांना अवगत करण्‍यासाठी परिसरात सर्वत्र क्यू आर कोड प्रदर्शित करण्‍यात येत आहेत. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पर्यटकांना ही तिकिट नोंदणी करता येईल.

ब) पेंग्विनच्या तीन पिलांचे बारसे - प्राणिसंग्रहालयात अलीकडे हम्‍बोल्‍ट पेंग्‍वीनच्‍या तीन नव्‍या पिलांचा जन्म झाला आहे. त्‍यांचे नामकरण देखील जाहीर करण्यात आले आहे. (१) फ्लॅशFLASH (नर / जन्‍म २ एप्रिल २०२२), (२) बिंगो BINGO – (नर / जन्‍म २६ एप्रिल २०२२) आणि (३) अॅलेक्‍सा ALEXA (मादी, जन्म ९ ऑगस्ट २०२२)  अशी ही नावे आहेत.

क) प्राणिसंग्रहालयाचे मनोगत - ‘मी राणीबाग बोलतेय'  दृकश्राव्य चित्रफितीचे प्रकाशन- प्राणिसंग्रहालयाच्‍या 'व्‍हर्च्‍युअली वाइल्‍ड' या मालिकेचा शेवटचा भाग ज्‍यामध्‍ये पूर्वीच्या राणीबागेच्‍या स्‍थापनेपासून ते आजच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयापर्यंतचे स्थित्‍यंतर दाखविण्‍यात आले आहे. या दृकश्राव्य चित्रफितनिमित्‍ताने प्राणिसंग्रहालयाची माहिती जनसामान्‍यांपर्यंत पोहोचत असून प्राणिसंग्रहालयातील महत्‍वाकांक्षी आधुनिकीकरण प्रकल्‍पातील ठळक घडामोडींवर प्रकाश टाकण्‍यात आला आहे. या भागाचे प्रक्षेपण प्राणिसंग्रहालयाच्‍या द मुंबई झू (The Mumbai Zoo) या यूट्यूब चॅनल (YouTube Channel) वर उपलब्‍ध आहे.

ड) पुस्‍तक प्रकाशन - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे लहान मुलांचे अत्‍यंत आवडीचे ठिकाण ठरले आहे. येथील वन्‍यप्राणी-पक्षी, खेळाची उपकरणे, मोठमोठे वृक्ष, बागा यांचा मुले नेहमीच आनंद घेतात. वाघ, बिबट्या, हत्‍ती, माकडं आदी वन्‍यप्राणी तसेच विविध पक्षी पाहणे, त्‍यांच्‍या विविध हालचाली, लकबी हे मुलांचे प्रमुख आकर्षण ठरते. बागा, झोपाळे येथे देखील विशेष गर्दी होते. या सर्व बालदोस्‍तांसाठी पर्यावरण स्‍नेही श्रीमती केटी बागली आणि मेधा राजाध्‍यक्ष लिखित ‘निघाली प्राण्‍यांची मजेदार वरात’ या मराठी पुस्‍तकाचे व त्याच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्‍यात आले. प्राणिसंग्रहालयातील वन्‍यप्राणी विश्‍वातील काही करामती, गंमती-जमती या कवितांमधून बालमित्रांना वाचावयास मिळतील.

इ) हरित उपक्रम (Green Initiative) -  वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे हरित क्षेत्र आहे. येथील प्‍लास्टिकच्‍या कच-याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी ठराविक ठिकाणी प्लास्टिक बॉटल क्रशर संयंत्र (Plastic Bottle Crusher Machine) लावण्‍यात येत आहेत. प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे यादृष्‍टीने हा महत्‍वाचा उपक्रम ठरतो आहे. सदर उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व (Corporate Social Responsibility) अंतर्गत राबविण्यात येत आहे.

Web Title: The three penguin chicks have been named Flash, Bingo and Alexa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई