धावत्या एक्सप्रेसमधील हत्याकांडाचा थरार...! नेमकं काय आणि कसं घडलं?
By मनीषा म्हात्रे | Published: August 1, 2023 06:22 AM2023-08-01T06:22:22+5:302023-08-01T06:24:29+5:30
चेतन सिंह सोबत याच एक्सप्रेसमध्ये कार्यरत असलेले हवालदार अमय घनश्याम आचार्य (२६) यांच्या जबाबातून एक्सप्रेसमध्ये काय घडलं? कस घडलं? याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे.
मुंबई : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) जवान चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. वापी स्थानकावरून एक्सप्रेस सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. या हत्याकांडाच्या थराराने महाराष्ट्र हादरला. चेतन सिंह सोबत याच एक्सप्रेसमध्ये कार्यरत असलेले हवालदार अमय घनश्याम आचार्य (२६) यांच्या जबाबातून एक्सप्रेसमध्ये काय घडलं? कस घडलं? याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे.
अमय घनश्याम आचार्य (२६) यांनी दिलेल्या जबाबानुसार, ३० जुलै रोजी नेहमी प्रमाणे रात्री ९ च्या सुमारास मुंबई सेंट्रल येथून सौराष्ट्र मेल मधून निघालो. मी, मिना आणि चेतन सह नरेंद्र परमार हवालदार सोबत होते. सुरत येथे ट्रेन रात्री १:११ वा पोहचली. तेथून जयपुर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन घेवून रात्री २.५३ वा मुंबई कडे प्रवास सुरु केला. यावेळी, टिकाराम मिना व पोशि चेतन सिंह यांची नेमणुक वातानुकुलीत डब्यात होती. तसेच मी आणि नरेंद्र परमार दोघांची नेमणुक स्लिपर कोच मध्ये होती.
गाडी मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने कामाचा रिपोर्ट देण्यासाठी मिना यांना पॅन्ट्री कोच नंतरच्या दुस-या B / 2 नंबरच्या वातानुकुलीत डब्यात भेटलो. त्यावेळी त्यांच्यासोबत चेतन सिंह व तीन तिकीट तपासणीस होते. त्याचवेळी, मिना यांनी सांगितले की, कॉन्स्टेबल चेतन सिंह याची तब्येत बिघडली आहे. मी चेतन सिंह याच्या अंगाला हात लावून त्याला ताप आहे का पाहिले. मात्र, त्याला ताप असल्याचे जाणवले नाही. मात्र, चेतन सिंह तब्येत खराब आसल्याचे सांगून बलसाड येथे उतरून द्यावे, असे मिना यांना सांगत होता. मिना यांनी त्याला समजावले की, दोन तीन तासांची ड्युटी बाकी आहे, गाडी मुंबईला पोहचल्यानंतर आराम कर असा सल्ला दिला.
मात्र, चेतन सिंह ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मीना यांनी इन्स्पेक्टर हरिश्चंद्र यांना मोबाईल वर संपर्क साधला. त्याने याबाबत मुंबई सेन्ट्रल नियंत्रण कक्षात कळविण्यास सांगितले. मिना यांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधून, तेथील अधिका-यांनी देखील सांगितले की, चेतन सिंह यास समजावुन सांगा व थोडीशी ड्युटी शिल्लक आहे, ती संपल्यावर मुंबईत जावून औषध उपचार करण्यास किंवा आराम करण्यास त्याला सांगा असे कळविले. त्यानुसार मिना यांनी चेतन सिंहला समजावले. मात्र, तो ऐकत नव्हता. नियंत्रण कक्षाशी बोलण्याचा हट्ट धरला. त्यानुसार, त्याचे असिस्टन्ट सिक्युरीटी कमिशनर सुजित कुमार पांडे यांच्याशी बोलणे करून दिले. त्यांनी देखील चेतनला समजावुन सांगितले. परंतु तो ऐकत नव्हता. मिना यांनी चेतन साठी काही थंड पेय आणायला सांगितले. मात्र, त्याने ते घेतले नाही.
त्याला एका ठिकाणी झोपवून रायफल स्वतःकडे घेवून बसलो. सिंह जास्त वेळ झोपला नाही. १० ते १५ मिनीटांनी तो उठला व माझ्या कडे रायफल मागण्यास सुरुवात केली. रायफल देण्यास नकार देत आराम करण्यास सांगितले. मात्र तो अंगावर धावून आला. रायफल दिली नाही म्हणून त्याने गळा आवळला. हातातून रायफल काढुन घेतली. तो तेथून निघुन गेला.
तो चुकून माझी रायफल घेवून गेला. याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार, मीना यांनी रायफल ताब्यात घेत त्याची रायफल त्याला दिली. मात्र सिंह रागातच होता. मीना यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. थोड्या वेळातच चेतन हा रायफलचे सेफटी कॅच हटवत आहे. त्यावरुन तो फायरिंग करण्याच्या मनस्थितीत आहे असल्याचे वाटल्याने मीना यांना सांगितले. त्यांनी सिंह याला शांत केले.
३१ जुलै च्या पहाटे ५.२५ वाजता ट्रेन सफाळे ते वैतरणा रेल्वे स्टेशन परिसरात आली होती. तेव्हा मीना यांच्यावर फायारींग झाल्याचे समजले. त्यानुसार, तेथे lB/5 कोचच्या दिशेने जावू लागलो. त्यावेळी समोरुन दोन तीन पॅसेन्जर धावत आले. ते घाबरलेले दिसत होते. त्यांच्या कडून मिना यांच्यावर चेतनने गोळीबार केल्याचे समजले.
तेव्हा, पुढे जाताच चेतन येताना दिसला. त्याचे हातात रायफल होती व त्याचा चेहरा रागावलेला दिसत होता. तो फायारिंग करेल या भीतीने मी मागे फिरलो. काही वेळाने कोणीतरी साखळी ओढल्याने मिरारोड व दहिसर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ट्रेन थांबल्याचे दिसले. मी बोगीचा पश्चिमेकडील दरवाजा अर्धवट उघडून बाहेर पाहीले असता समोरुन ट्रॅकवर उतरुन चेतन सिंह येताना दिसला. त्याचे हातात रायफल तशीच होती व तो फायरिंग पोजिशन मध्ये होता. मी बोगीतील प्रवाशांना ओरडुन खिडक्या बंद करुन खाली पडून राहण्यास सांगितले. व चेतन सिंह काय करतो ते पाहु लागलो. चेतन सिंह याने रायफल ट्रेन च्या दिशेने ताणलेली होती. व तो अधुन मधुन फायरिंग करत होता. माझ्या कानावर काही फायरिंगचे आवाज आले. मी थोडा वेळ एका बाथरुम मध्ये लपून राहिलो. थोड्या वेळाने बाहेर येवुन मी पाहीले तेव्हा, चेतन सिंह ट्रॅक वरुन चालत मिरारोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असल्याचे मला दिसले. त्याचे हातात रायफल तशीच होती असा थरारक घटनाक्रम आचार्य यांनी सांगितले आहे.
हा वादच हत्याकांडामागे कारणीभूत होता की? यामागे आणखीन काही आहे? याबाबत रेल्वे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
नेमकी जबाबदारी काय?
लोअर परेल येथिल वर्कशॉप मध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे सुमारे २५ ते ३० जण काम करतात. काही जवानांना परिक्षेत्रातील सुरक्षेसाठी नेमले जाते. व काहींची नेमणूक मेल पॅसेन्जर गाड्यांवर एस्कॉर्ट म्हणुन केली जाते. २८ जुलै पासून या टीमला ते सौराष्ट्र मेल वर ड्युटी देण्यात आली होती. ट्रेन रात्री ९.५ वा मुंबई सेंट्रल येथुन सुटते व ओखा गुजरात येथे जाते. सदर गाडीवर सुरत पर्यंत टिम जाते. सुरत येथुन जयपुर मुंबई ट्रेन घेवुन तिच टिम मुंबईत परत येते. हे चक्र सुमारे आठवडा भर चालते. असेही त्यांनी कामाचे स्वरूप नमूद केले.