लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सी ऑफ ब्लू’ अशी ओळख असलेल्या भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या वातावरणात एक वेगळीच उत्साहाची भरती आल्याचे चित्र रविवार सकाळपासून पाहायला मिळत होते. मात्र, तीन विकेटनंतर संथपणे सुरू असलेला ऑस्ट्रेलियाचा खेळ हेडच्या शंभरीनंतर चौकार आणि षटकारांनी जसजसा आक्रमक होऊ लागला, तसतशी या उत्साहाला ओहोटी लागली.
पहिल्या सामन्यापासून आक्रमक खेळाची चुणूक दाखविणाऱ्या भारतीय संघाविषयी अपेक्षा उंचावलेल्या होत्या. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दूरचित्रवाणी संच, एलईडी स्क्रीन लावून एकत्रितपणे थेट सामना पाहण्याची व्यवस्था केली गेली होती. कुठे दुधाचा अभिषेक, तर कुठे महाआरती, कुठे नमाजपठण, तर कुठे झांजा-ढोलताशांच्या गजरात भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली गेली. अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून उत्साहात रंग भरले गेले. ही शांतता सुरुवातीला प्रत्येक विकेटगणिक फुटणाऱ्या फटाक्यांमुळे भंग होत होती. शिवाजी पार्क येथे भव्य स्क्रीन लावण्यात आली होती. क्रिकेटप्रेमींनी जमून जल्लोष केला. भारताचा डाव २४० धावांमध्ये गुंडाळल्यानंतरही मुंबईकरांच्या आशा पल्लवित होत्या. आवडत्या क्रिकेट हीरोंचे कटआउट उंचावत, ‘जितेगा भाई जितेगा’चा नारा देत, क्रिकेटप्रेमी भारतीय टीमच्या पाठिशी उभे होते. विराट, रोहित, शमी, सिराज हे क्रिकेटपटू देवच जणू. क्रिकेटच्या या देवांची देव दिवाळी जणू भारतात आठवडाभर आधीच साजरी होत होती.
फलंदाजांनी निराशा केल्यामुळे व्यक्त केली नाराजीया जोडीला भारताचे झेंडे, विश्वचषकाची प्रतिकृती हवेत उंचावले जात होते. फलंदाजांनी निराशा केल्यामुळे क्रिकेटप्रेमी शमी, सिराज, बुमराह या गोलंदाजांवर विश्वास व्यक्त करत होते, पण पहिल्या तीन विकेटनंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सावरले. खेळी संथपणे पुढे सरकत होती. वातावऱणातील जोश पुन्हा आटला असला, तरी भारताच्या जिंकण्याच्या आशा कायम होत्या. हेडने १००ची खेळी केल्यानंतर मात्र या उत्साहाला ओहोटी लागायला सुरुवात झाली आणि जिंकण्याच्या आशा मावळल्या त्या कायमच्याच.
स्क्रीन लावण्यात स्थानिकांचाही पुढाकार घाटकोपरच्या दत्तदर्शन सोसायटीत मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामन्याचा आनंद रहिवाशांनी लुटला. प्रभादेवीत राजाभाऊ साळवी उद्यानाशेजारीच मोठी स्क्रीन लावली गेली होती. दादर, प्रभादेवीतील अन्य ठिकाणचे रस्ते मात्र मॅचदरम्यान निर्मनुष्य झालेले पाहायला मिळाले. रस्त्यावरील वाहतूकही तुरळक होती. बोरीवलीच्या गोराई येथील पेप्सी ग्राउंडवर एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. या उद्यानात रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. विलेपार्ले येथील हनुमान रोड येथे चार-पाच ठिकाणी स्थानिकांनीच पुढाकार घेऊन अशी सोय केली होती, तर जोगेश्वरीतील राजेश्वर सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन सामन्याचा आनंद लुटला.
सोशल मिडीया हळहळलाअंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सामना झुकल्यावर क्रिकेट चाहत्यांमध्ये तणावाचे वातावरण पसरले. ज्या क्षणाला भारताचा संघ पराभव होणार असल्याचे लक्षात येताच आशा पल्लवित असणाऱ्या अनेक क्रिकेट प्रेमिंच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले. काही नेटिझनसने ऑस्ट्रेलियाचा बदला न घेतल्याच्या रागात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. काही नेटिझनसने अंपायर संघासाठी अनलकी असल्याच्या प्रतिक्रिया ही दिल्या आहेत.