फटाक्यांचा ‘टाइम बॉम्ब,’ मुंबईकरांच्या कानठळ्या; मध्यरात्रीपर्यंत फोडले फटाके, प्रदूषणात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 06:38 AM2023-11-14T06:38:25+5:302023-11-14T06:38:38+5:30
८ ते १० च्या वेळमर्यादेला वात
मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये रात्री ८ ते १० हे दोनच तास फटाके उडविले जावेत, असा दंडक उच्च न्यायालयाने घालून दिला असतानाच प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांनी रविवारी मध्यारात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवळ वायू प्रदूषणाचेच नव्हे तर ध्वनी प्रदूषणाचेही प्रमाण वाढले आहे.
गेली काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात कमालीचे प्रदूषण झाले होते. या पार्श्वभूमीवर दिवाळीत मुंबईकरांनी तीन तास फटाके फोडावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने ६ नोव्हेंबरला दिले होते. मात्र, आपल्या आदेशात सुधारणा करून न्यायालयाने रात्री ८ ते १० या दोन तासांतच आतषबाजी करावी, असे आदेश दिले होते. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी न्यायालयाच्या या आदेशांचे पालन होणे अपेक्षित होते. मात्र, मध्यरात्रीपर्यंत शहराच्या विविध भागांत फटाके फोडले जात होते.
हवेला रंग आणि गंधही फटाक्यांचा
बीकेसी, बोरिवली, देवनार, मालाड, चेंबूर, कुलाबा आणि मालाड येथील वायू प्रदूषणाची पातळी वाईट नोंदविण्यात आली, तर चकाला, भांडूप, माझगाव, नेव्हीनगर, वरळी, बीकेसी, कांदिवली, कुर्ला, मुलुंड, पवई, सायन आणि विलेपार्ले येथील वायू प्रदूषणाची पातळी मध्यम नोंदविण्यात आली.
आतषबाजीवर भर
कुलाबा, नरिमन पॉइंटपासून वरळी, कुर्ला, मालाड, चेंबूर, भांडूपसह बहुतांश ठिकाणी रात्री पावणेअकरा वाजेपर्यंत फटाके वाजविले जात होते. सुतळी बॉम्ब आणि फटाक्यांची माळ वाजविण्याऐवजी आकाशात आतषबाजी करणारे कलरफुल फटाके मोठ्या प्रमाणावर वाजविले जात होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणासह वायू प्रदूषणात मोठी भर पडली होती.