देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू आणि राज्य सरकारचा महत्वाकांक्षी अशा शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकच्या लोकार्पणाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सागरी सेतूचं लोकार्पण होणार असून या सागरी सेतूवरुन प्रवास करण्यासाठी टोलचा दर किती असणार हेही निश्चित करण्यात आलं आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलचा दर २५० रुपये इतका असणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या सागरी सेतूवरुन प्रवास करण्यासाठी ५०० रुपये टोल आकारण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण आजच्या बैठकीतील निर्णयानंतर २५० रुपये टोल भरावा लागणार असल्याचं निष्पन्न झालं आहे.
पंतप्रधान मोदी करणार लोकार्पणपंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी या सागरी सेतूचं लोकार्पण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. सेतूचं काम पूर्ण झालं असूनही उद्घाटन केलं जात नसल्यानं ठाकरे गटाकडून सरकारवर टीका केली जात होती. अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. हा मार्ग २२ किमी लांबीचा असून जवळपास १८ किमी समुद्रातून आहे. तर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचे अंतर आता अवघ्या २० मिनिटांत कापता येईल. दुसरीकडे हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला देखील जोडला जातोय. त्यामुळे मुंबई-पुणे अंतर देखील या मार्गामुळे कमी होण्यास मदत होईल.