मागेल त्याला पाणी देणार रेल्वे! उन्हाळा, संभाव्य उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवर नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 12:15 PM2024-04-14T12:15:45+5:302024-04-14T12:15:56+5:30
मध्य रेल्वेने प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी पावले उचलली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेने प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी पावले उचलली आहेत. ज्यात स्थानकांवर पाण्याचे नळ, वॉटर कूलर, कूपनलिका इत्यादी समाविष्ट आहे. मध्य रेल्वेवरील ४३४ स्थानकांवर एकूण ८ हजार ९३ पाण्याचे नळ, ४९८ वॉटर कूलर आणि १४९ कूपनलिका देण्यात आल्या आहेत.
उन्हाळा आणि संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला आहे. पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वेंना सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल, अशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई विभाग : १२०० पाण्याचे नळ, २४५ वॉटर कूलर आणि १० कूपनलिका उपलब्ध
काय आहेत सूचना?
- वॉटर कूलर कार्यरत असल्याची खात्री करा.
- महत्त्वाच्या स्थानकांवर पाण्याचे टँकर
तैनात करा.
- सर्व प्लॅटफॉर्मवर पाण्याच्या उपलब्धतेची पुष्टी करा; स्थानकांवर नियमित तपासणी करा.
काय करणार?
- पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या भागात, रेल्वे अधिकारी महानगरपालिका राज्य सरकारांशी सहयोग करतील आणि पर्यायी पाणीपुरवठा उपाय शोधतील.
- पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही उद्भवणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून चोवीस तास देखरेखीसाठी एक प्रणाली लागू केली जाईल.