नथ, पर्स आणि दिवे, वाण लुटण्याचा ट्रेंडही बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:08 PM2024-01-14T12:08:39+5:302024-01-14T12:08:58+5:30
महिलांमध्ये वाण साहित्य खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
मुंबई : संक्रांतीचे हळदी-कुंकू व वाण लुटण्याच्या उत्साहाचे नियोजन झाल्यानंतर उत्सवाची खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची बाजारात गर्दी होतेय. मागील काही वर्षांत वाण लुटण्याचा ट्रेंड बदलल्यामुळे आता महिला वर्ग याबाबत सिलेक्टिव्ह झाला आहे.
महिलांमध्ये वाण साहित्य खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. आपले वाण इतरांपेक्षा वेगळे कसे राहील याला प्राधान्य देत महागाईकडे दुर्लक्ष करत वाण खरेदी करण्यासाठी त्यांची एकच लगबग सुरू असून, बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढू लागली आहे. नवीन प्रकारच्या वाण साहित्य खरेदीला महिला पसंती देत असल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुरू राहणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना देण्यात येणाऱ्या वाण साहित्याच्या खरेदीसाठी शहर उपनगरातील लालबाग, दादर, क्राॅफर्ड मार्केट, मशीद बंदर, नटराज मार्केट या ठिकाणी वाण खरेदीसाठी महिलांची अधिक गर्दी दिसून येते.
या वस्तूंना मिळतेय पसंती
यंदा लहान-मोठ्या वाण साहित्यामध्येही अनेक नवीन प्रकार पाहायला मिळत असून ते महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. या वर्षी वाणाच्या साहित्यामध्ये प्रति वस्तू १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महिला अधिकाधिक घाऊक बाजारपेठेला पसंती देत विक्रेते लक्ष्मण खैरे यांनी सांगितले.
आता रोजच्या वापरात गृहिणींना उपयोगी पडतील अशा वस्तूंची खरेदी केली जाते. यात फोल्डिंग बॅग्ज, ड्रायफ्रूट स्लायसर, ज्वेलरी बॉक्स, चीज ग्रेटर, हटके दिवे, पर्स-ऑर्गनायझर आणि डिझायनर पाऊच यांसारख्या वस्तूंना विशेष पसंती दिली जाते. यात ज्वेलरी बॉक्स आणि प्लास्टिक वस्तूंना मागणी आहे.
वाण खरेदीसाठी गर्दी स्टील, पितळ, तांबे, प्लास्टिक यामध्ये साहित्य उपलब्ध आहे. स्टीलमध्ये प्लेट, ग्लास, दिवे, उदबत्ती स्टॅण्ड आदींना मागणी आहे. तांब्याची प्लेट, निरांजन यालाही महिला वर्गाची पसंती आहे.