Join us

नथ, पर्स आणि दिवे, वाण लुटण्याचा ट्रेंडही बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:08 PM

महिलांमध्ये वाण साहित्य‎ खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.

मुंबई : संक्रांतीचे हळदी-कुंकू व वाण लुटण्याच्या उत्साहाचे नियोजन झाल्यानंतर उत्सवाची खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची बाजारात गर्दी होतेय. मागील काही वर्षांत वाण लुटण्याचा ट्रेंड बदलल्यामुळे आता महिला वर्ग याबाबत सिलेक्टिव्ह झाला आहे.  

महिलांमध्ये वाण साहित्य‎ खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.‎ आपले वाण इतरांपेक्षा वेगळे कसे‎ राहील याला प्राधान्य देत‎ महागाईकडे दुर्लक्ष करत वाण‎ खरेदी करण्यासाठी त्यांची एकच‎ लगबग सुरू असून, बाजारपेठेत‎ खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढू‎ लागली आहे. नवीन प्रकारच्या‎ वाण साहित्य खरेदीला महिला‎ पसंती देत असल्याचे चित्र‎ बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुरू राहणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना देण्यात‎ येणाऱ्या वाण साहित्याच्या‎ खरेदीसाठी  शहर उपनगरातील लालबाग, दादर, क्राॅफर्ड मार्केट, मशीद बंदर, नटराज मार्केट या ठिकाणी वाण खरेदीसाठी महिलांची अधिक गर्दी दिसून येते. 

या वस्तूंना मिळतेय पसंती  यंदा लहान-मोठ्या वाण‎ साहित्यामध्येही अनेक नवीन‎ प्रकार पाहायला मिळत असून ते‎ महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत.‎ या वर्षी वाणाच्या साहित्यामध्ये‎ प्रति वस्तू १० ते २० रुपयांनी वाढ‎ झाली आहे. त्यामुळे महिला अधिकाधिक घाऊक बाजारपेठेला पसंती देत विक्रेते लक्ष्मण खैरे यांनी सांगितले.  आता रोजच्या वापरात गृहिणींना उपयोगी पडतील अशा वस्तूंची खरेदी केली जाते. यात फोल्डिंग बॅग्ज, ड्रायफ्रूट स्लायसर, ज्वेलरी बॉक्स, चीज ग्रेटर, हटके दिवे, पर्स-ऑर्गनायझर आणि डिझायनर पाऊच यांसारख्या वस्तूंना विशेष पसंती दिली जाते.  यात ज्वेलरी बॉक्स आणि प्लास्टिक वस्तूंना मागणी आहे.   वाण खरेदीसाठी गर्दी स्टील, पितळ, तांबे, प्लास्टिक यामध्ये साहित्य उपलब्ध आहे. स्टीलमध्ये प्लेट, ग्लास, दिवे, उदबत्ती स्टॅण्ड आदींना मागणी आहे. तांब्याची प्लेट, निरांजन यालाही महिला वर्गाची पसंती आहे.

टॅग्स :मकर संक्रांती