Join us

भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार; मेट्रो ३ च्या चाचण्या मे अखेर पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:46 AM

बहुप्रतिक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत.

मुंबई : बहुप्रतिक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने मुंबईमेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंडीपेंडंट सेफ्टी असेसर (आयएसए) आणि कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) यांना तपासणीसाठी बोलविले जाणार आहे, अशी माहिती एमएमआरसीने दिली. 

मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेवर इंटीग्रेटेड ट्रायल रनला मागील महिन्यात सुरुवात झाली होती. त्यामध्ये मेट्रो गाडीच्या ९५ किमी प्रतितास या वेगावर चाचण्या घेतल्या जात आहेत, तसेच विविध यंत्रणांच्या चाचण्या घेतल्या जात असून, त्यामध्ये टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, ट्रॅक्शन आणि रूळ आदींच्या चाचण्यांचा समावेश आहे. 

आता पुढील आठवड्यापासून मेट्रो गाडीच्या स्टॅटीक लोडसह चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या मे महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरसीने केले आहे. या चाचण्या पूर्ण होताच मेट्रो मार्गिका संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया एमएमआरसीकडून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची चिन्हे आहेत. 

मेट्रो ३ मार्गिका- 

१) एकूण स्थानके - २७ 

२) १० पहिल्या टप्प्यात वाहतूक सुरू होणारी स्थानके 

३) पहिला टप्पा : आरे ते बीकेसी

४) ३७,००० कोटी रुपये मेट्रो मार्गिकेसाठी खर्च 

दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांच्याही चाचण्या-

१) सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी मार्गिकेच्या संचलनासाठी ९ गाड्या लागणार आहेत. 

२)  या गाड्या वर्षभरापूर्वीच मेट्रोच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण मार्गिकेचे संचलन करण्यासाठी आणखी ११ गाड्या एमएमआरसीला मिळाल्या आहेत. 

३) पहिल्या टप्प्यातील गाडी आणि यंत्रणेच्या चाचण्यांसोबत दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांच्याही चाचण्या एमएमआरसीकडून घेतल्या जात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईएमएमआरडीएमेट्रो