माउंट एल्ब्रस शिखरावर फडकला तिरंगा, मुंबई अग्निशमन दलाचाही ध्वज उँचावला
By सचिन लुंगसे | Published: August 28, 2022 06:29 PM2022-08-28T18:29:54+5:302022-08-28T18:33:23+5:30
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे मुख्यालय भायखळा येथे आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे जवान योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छिंद्र शेळके या दोघांनी युरोपातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट एल्ब्रसवर भारतीय स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट २०२२ रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता यशस्वीरित्या पोहोचून शिखर सर केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आणि खडतर हवामानाचा सामना करीत केलेल्या या अभिमानास्पद कामगिरी प्रसंगी या दोन्ही जवानांनी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि त्यासोबत मुंबई अग्निशमन दलाचा ध्वज देखील एल्ब्रस शिखरावर अभिमानाने फडकवला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे मुख्यालय भायखळा येथे आहे. या मुख्यालयातील नियंत्रण कक्षात सध्या कार्यरत असलेले योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छिंद्र शेळके या दोन्ही अग्निशमन जवानांना गिर्यारोहणाची आवड आहे. सन २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेत रुजू झाल्यानंतर देखील त्यांनी शारीरिक व मानसिक क्षमता जोपासण्यासाठी गिर्यारोहणाचा सराव कायम ठेवला आहे. गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च पर्वत शिखरे सर करण्याचे त्यांचे ध्येय आहे. बडगुजर व शेळके यांनी यापूर्वी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो स्वतंत्ररीत्या आणि यशस्वीपणे सर केले होते. आता रशियामधील नैऋत्येकडे असलेले माउंट एल्ब्रस एकाचवेळी पादाक्रांत करून त्यांनी आणखी एक बहुमान संपादीत केला आहे.
माउंट एलब्रस हे युरोपात काकेशस पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १८ हजार ५०५ फूट) आहे. रशियाच्या नैऋत्येला स्थित आणि काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांच्या मध्ये वसलेल्या या शिखरावरील पर्वतारोहण तांत्रिकदृष्ट्या मध्यम आव्हानात्मक मानले जात असले तरी येथील हवामान मात्र प्रचंड लहरी आहे. वर्षभर सातत्याने येणारी हिम वादळे, उणे २५ अंश पर्यंत घसरणारे तपमान आणि शरीर गोठवून टाकणारी थंडी, त्यामुळे येथे अनेक गिर्यारोहकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. असे असूनही योगेश बडगुजर आणि प्रणित शेळके यांनी हे आव्हान स्वीकारले.
महानगरपालिकेची यथोचित परवानगी प्राप्त करून हवाई मार्गे दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी या दोघांनी रशिया गाठले. तेथे स्थानिक प्रशासनाची अधिस्वीकृती प्राप्त करण्याची सर्व प्रक्रिया आणि गिर्यारोहणाची प्राथमिक चाचणी देखील पार पाडली. भारतीय स्वातंत्र्य दिनी शिखरावर पोहोचायचे या निर्धाराने, दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्री नंतर १ वाजता गराबासी या बेस कॅम्पपासून त्यांनी एल्ब्रस शिखराकडे वाटचाल सुरू केली. नेमके संपूर्ण प्रवासादरम्यान दृश्यमानता फारच कमी झाली. १५ फुटाच्या अंतरापलीकडे काहीही दिसत नव्हते. ४५ ते ५० किलोमीटर प्रती तास वेगाने आणि हिमकणांसह वाहणारे बोचरे वारे, उणे २५ ते ३० अंश तापमान, वेगवान वाऱ्यामुळे बर्फाचा होणारा मारा अशा खडतर आव्हानांचा सामना करत दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता (स्थानिक रशियन वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता) योगेश बडगुजर आणि प्रणित शेळके शिखरावर पोहोचले. तेथे त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि मुंबई अग्निशमन दलाचा ध्वज देखील अभिमानाने फडकवला. शिखरावर पोहोचण्यास त्यांना तब्बल आठ तास लागले आणि परत बेस कँपला ते दुपारी दीड वाजता पोहोचले. सलग सुमारे १२.३० तास खडतर हवामानाचा सामना करून या दोघांनी आपले ध्येय पूर्ण केले. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या चार जणांच्या भारतीय चमूशिवाय इतर कोणालाही शिखर गाठणे शक्य झाले नाही. खडतर हवामानामुळे इतर देशातील ४ संघांनी अर्ध्यातून माघार घेतली.
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मीटर / २९,०३१ फूट उंच) सन २०२४ मध्ये सर करण्याचे उद्दिष्ट या दोघांनी ठेवले असून त्यादृष्टीने यापुढेही इतर मोहिमा सर करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. अशा कामगिरीतून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा, मुंबई अग्निशमन दलाचा नावलौकिक सातही खंडात झळकावण्याचा त्यांचा मानस आहे.
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मीटर / २९,०३१ फूट उंच) सन २०२४ मध्ये सर करण्याचे उद्दिष्ट या दोघांनी ठेवले असून त्यादृष्टीने यापुढेही इतर मोहिमा सर करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. अशा कामगिरीतून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा, मुंबई अग्निशमन दलाचा नावलौकिक सातही खंडात झळकावण्याचा त्यांचा मानस आहे.
बडगुजर आणि शेळके यांच्या यशाबद्दल महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, सह आयुक्त (सुधार) केशव उबाळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.