Join us

पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 8:55 AM

अन्य साथीदारांचा शोध सुरू; झिशान सिद्दिकीचा जबाब नोंदविण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुन्हे शाखेने माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात पुण्यातून अटक केलेल्या रुपेश मोहोळ, करण साळवे आणि शिवम कोहाड यांना सुरुवातीला हत्येची सुपारी दिल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले. सिद्दिकी यांच्या हत्येसाठी मागितलेल्या मोठ्या रकमेवरून झालेल्या वादानंतर त्यांनी यातून अंग काढून घेतल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.

गुन्हे शाखेने आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली आहे. मोहोळ, साळवे आणि कोहाड यांना गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा अटक केली. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा फोटो रुपेश वापरत होता. तर, एकावर मारहाणीचा गुन्हा नोंद आहे.  या तिघांची बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी निवड करण्यात आली होती.

हत्येचे काम राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांना देण्यात आले होते. मोहोळ, साळवे आणि कोहाड या तिघांची राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांच्याशी ओळख होती. त्यामुळे, कनोजिया आणि सप्रे यांनी या तिघांना बाबा सिद्दिकी हत्येचे काम दिले.

तिघेही पुण्यातून दोन वेळा डोंबिवलीत आले. कळंबोली आणि अन्य ठिकाणीही भेटीगाठी झाल्या. त्यांनी सिद्दिकी यांच्या घर कार्यालयाची रेकी केली. सिद्दिकी यांचे नाव मोठे असल्याने या त्रिकुटाने त्यांच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी केली. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नसल्याने त्यांनी माघार घेतली. आरोपी पदवीधर अन् बारावी पास मूळचा पुण्याचा असलेला मोहोळ हा पदवीधर आहे. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. साळवेने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून, तो भाड्याने हॉटेल चालवतो. कोहाडदेखील बारावी पास असून, शूटिंग लाइनमध्ये कामाला आहे.

झिशान सिद्दिकीचा जबाब

गुन्हे शाखेकडून गुरुवारी झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्याकडील माहितीच्या आधारेही गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :बाबा सिद्दिकीमृत्यूपुणे