२५ हजार डॉलर्स पळवणाऱ्या त्रिकुटाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:25 PM2024-03-07T14:25:18+5:302024-03-07T14:26:06+5:30
गुन्हे शाखेने माजिद खान उर्फ मन्नू (४४), मयंक शर्मा उर्फ लड्डू (२२) आणि आकाश अग्रवाल उर्फ कबीर उर्फ कब्बू (१९) यांना बेड्या ठोकल्या असून मुख्य सूत्रधार कृष्णन याचा पोलिस शोध घेत आहेत.
मुंबई : फिल्म लाइनच्या व्यवसायात असल्याची बतावणी करत फॉरेन करन्सी एक्स्चेंज व्यावसायिकाकडून २५ हजार अमेरिकन (यूएस) डॉलर्स घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष आठने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने माजिद खान उर्फ मन्नू (४४), मयंक शर्मा उर्फ लड्डू (२२) आणि आकाश अग्रवाल उर्फ कबीर उर्फ कब्बू (१९) यांना बेड्या ठोकल्या असून मुख्य सूत्रधार कृष्णन याचा पोलिस शोध घेत आहेत.
विलेपार्लेतील रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय तक्रारदार यांचा विदेशी चलन बदलून देण्याचा (फॉरेन करन्सी एक्स्चेंज) व्यवसाय आहे. दिल्लीमधील ट्रॅव्हलिंग व्यावसायिकाने त्याच्या ओळखीच्या गौरव गोस्वामी नावाच्या दिल्ली येथे टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला फॉरेन करन्सी एक्स्चेंजसंदर्भात मदत पाहिजे असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी गोस्वामीशी संपर्क साधला असता त्याने एका मोठ्या व्यक्तीला २५ हजार यूएस डॉलरची आवश्यकता असून तो सांताक्रूझमधील हॉटेल ग्रँड हयातमध्ये येणार असल्याचे सांगत कृष्णन नावाच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर त्यांना पाठवला.
गोस्वामीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तक्रारदार हे २७ फेब्रुवारीला पत्नीसोबत यूएस डॉलर्स घेऊन कृष्णनला भेटण्यासाठी हॉटेल ग्रँड हयातमध्ये गेले.
अशी करायचे फसवणूक
टोळीने मुंबई तसेच देशभरात पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकांना बोलावून अशा प्रकारे फसवल्याचे समोर आले आहे. यात २५ जानेवारीला आरोपींनी फॉरेक्स ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय आहे.
- हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये कृष्णन नाव सांगणारी व्यक्ती त्यांना भेटली. त्याने फिल्म लाइन व्यवसायात आल्याचे सांगत हॉटेलच्या लॉबीमध्ये अभिनेता अक्षय कुमार याची शूटिंग चालू असल्याने येथे भेटायला बोलावल्याची बतावणी केली. पुढे त्याने तक्रारदार यांना बोलण्यात गुंतवून २५ हजार यूएस डॉलर्स घेत तेथून पसार झाला.
- सगळीकडे शोध घेऊनही कृष्णन न सापडल्याने तक्रारदार यांनी वाकोला पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
- गुन्हे शाखेच्या कक्ष आठचे प्रमुख लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
- तपासादरम्यान माहिती समजताच उत्तर प्रदेशमधील रहिवासी खान याच्यासह दिल्लीतील रहिवासी शर्मा आणि अग्रवाल यांना अटक करण्यात आली असून आरोपी कृष्णनचा शोध सुरू आहे.