राजा-महाराजांच्या उत्सवात १२ अब्ज रुपयांची उलाढाल, गणेशोत्सवालाही आता बाजारीकरणाचे स्वरूप

By सचिन लुंगसे | Published: September 15, 2023 12:49 PM2023-09-15T12:49:41+5:302023-09-15T12:55:25+5:30

गणेशोत्सवालाही आता बाजारीकरणाचे स्वरूप मिळत असून, जाहिरातदारांसह कॉर्पोरेट कंपन्यांनी उत्सवात शिरकाव केल्याने आता हा उत्सव कॉर्पोरेट झाला

The turnover of 12 billion rupees in the festival of kings and maharajas, Ganeshotsav is also now in the form of marketing | राजा-महाराजांच्या उत्सवात १२ अब्ज रुपयांची उलाढाल, गणेशोत्सवालाही आता बाजारीकरणाचे स्वरूप

राजा-महाराजांच्या उत्सवात १२ अब्ज रुपयांची उलाढाल, गणेशोत्सवालाही आता बाजारीकरणाचे स्वरूप

googlenewsNext

मुंबई :

गणेशोत्सवालाही आता बाजारीकरणाचे स्वरूप मिळत असून, जाहिरातदारांसह कॉर्पोरेट कंपन्यांनी उत्सवात शिरकाव केल्याने आता हा उत्सव कॉर्पोरेट झाला आहे. विशेषत: कॉर्पोरेट कंपन्या आणि जाहिरातदारांच्या आर्थिक उलाढालींमुळे आजघडीला मुंबईच्यागणेशोत्सवाच्या बाजारपेठेत सुमारे १२ अब्ज रुपयांची उलाढाल होत असतानाच इकोनॉमी वाढत असल्याने त्यात टिकून राहण्यासह प्रसिद्धीभिमुख राहता यावे, म्हणून मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील स्पर्धांना आपसूकच खतपाणी घातले जात आहे. यामुळे राजा, महाराजा, सम्राट आणि नवसाला पावणारा बाप्पांची रीघ वाढतच आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील छोट्या आणि मोठ्या गणेशोत्सव मंडळांचा आकडा हा सुमारे १२ हजारांच्या आसपास आहे. एका गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सवातील आर्थिक उलाढाल ही अंदाजे सरासरी १० लाखांच्या आसपास आहे. दहा दिवसांतील आर्थिक घडामोडी पाहिल्या तर ही रक्कम संपूर्ण मुंबईची अब्जावधी होते. 

- मुंबईत पूर्वी जत्रा होत्या. आता उत्सवांच्या स्वरुपात जत्रा भरत आहे.
- स्पर्धांमुळे प्रसिद्धी मिळते. नावे मोठी होतात. त्यामुळे स्पर्धा वाढते आहे.
- हिंदू कॉलनी, गिरगावात आजही अनेक मंडळे नाटक, संगीत, व्याख्यानांचे कार्यक्रम करत आहेत.
- लालबागचा राजा किंवा तत्सम मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम शक्य नाहीत. कारण तिकडे गर्दीचा लोट मोठा असतो. 
- मोठ्या मंडळांकडे कॉस्मोपॉलिटीन लोक येतात. त्यामुळे तिथे संगीत, नाटकांचे मॉड्युल बसत नाही.

गणेशोत्सवाचा कल मार्केट इकोनॉमीकडे गेला तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे नाही. उत्सवावेळी ग्राहकाचा मूड वेगळा असतो. खिशात पैसे असतात. गणेशोत्सव कॉर्पोरेट झाला असून, ते चांगले झाले आहे. कारण त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. खरेदी विक्री वाढते. लोकांना रोजगार मिळतो. आता गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे.     - जयराज साळगावकर, उद्योजक

गणेशोत्सवाचे बाजारीकरण होते आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण उत्सवामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळते. उत्सवातून सरकारला पैसा मिळतो. मंडळाला जाहिरात मिळणे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. स्पर्धेशिवाय माणूस पुढे जात नाही. 
- ॲड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती

दक्षिण मुंबईतला झवेरी बाजार तर आतापासून चकाकू लागला असून, दहा दिवसांपैकी एका दिवसात मुंबईच्या सोने बाजारात खरेदी विक्रीमुळे सुमारे २०० कोटींची आर्थिक उलाढाल होते. १० दिवसांचा अंदाज बांधला तर हा आकडा सहज २ हजार कोटींच्या आसपास जातो.
- कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन

Web Title: The turnover of 12 billion rupees in the festival of kings and maharajas, Ganeshotsav is also now in the form of marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.