आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत रस्सीखेच दिसत असून माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्येला लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात गावदौरे आणि स्थानिक सभांच्या माध्यमातून प्रचारालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे सुशील कुमार शिंदे यांनीही प्रणिती शिंदेंना यंदा दिल्लीला पाठवायचं आहे, असे विधान केल्याने त्यांनी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, तो महाविकास आघाडीतील जागावाटपानंतरच ते जाहीर होईल. त्यातच, वंचित बहुजन आघाडी व प्रणिती शिंदे यांच्यात शीतयुद्ध रंगला आहे. त्यावर, आमदार प्रणिती यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या सभांमध्ये भाषण करताना नाव न घेता भाजपाला मदत करणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला होता. काँग्रेस. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीला विरोध करणारे पक्ष अप्रत्यक्षपणे भाजपाला साथ देत असल्याचं प्रणिती शिंदेंनी म्हटलं होतं. शिंदेंच्या या विधानानंतर वंचित बहुजन आघाडीने अधिकृत ट्विटर हँडलवरुन प्रणिती शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भाजपा प्रवेशाचा मुहूर्त कधी आहे?, असा सवालही उपस्थित केला होता. याच अनुषंगाने प्रणिती शिंदेंना प्रश्न विचारला असता, त्यांनी वंचितने केलेली पोस्ट काढावी, असे आवाहन केले आहे. तसेच, आपल्या विधानावर स्पष्टीकरणही दिले आहे.
''मी काही पक्ष असं म्हटलं होतं, त्यात वंचितचं नाव कुठे आहे. मग, त्यांनी ती पोस्ट काढून टाकावी, कारण मी कोणाचंही नाव घेतलं नाही,'' असे आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. मला माहिती नाही ते असं का करत आहेत. मी माझ्या सभेत एवढंच म्हणाले होते की, जे कोणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे मत विभागणी करतात ते भाजपाला मदत करतात. मी कोणाचेही नाव घेतलं नाही, पण हे उघड असून सगळ्यांनाच माहिती आहे,'' असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.
काय होती वंचितची ट्विटर पोस्ट
ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित - बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही.नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?, असा सवाल वंचितने ट्विटर अकाऊंटवरुन विचारला होता.