Join us

काँग्रेसची बैठक, थोरातांचा समजूतदारपणा; पटोलेंचा जीव भांड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:52 AM

श्रेष्ठींच्या कानमंत्रामुळे बैठक शांततेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे काँग्रेसमधील उघडकीस आलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक येथील टिळक भवनात पार पडली. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंच्या वादामुळे ही बैठक वादळी ठरेल अशी चिन्हे होती. मात्र दिल्लीने दिलेला कानमंत्र आणि थोरातांनी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे ही बैठक शांततेत पार पडली आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जीव भांड्यात पडला.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान   नाना पटोले यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज असलेल्या थोरातांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून आपण पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तसेच विश्वजित कदम, नसीम खान आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

काँग्रेस पक्ष हा आशेचा किरण आहे. त्यामुळे आपल्याला जबाबदारीने गोष्टी कराव्या लागतील, समन्वय करावा लागेल. पक्षाचे हाथ से हाथ जोडो अभियान सुरू असताना माझा हात मोडला. आता तो जोडायचे आमचे काम सुरू आहे.- बाळासाहेब थोरात,माजी मंत्री

काँग्रेस एक आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत. वातावरण दूषित झाले होते, त्यातून एकजुटीचा संदेश द्यायचा होता.मी बाळासाहेबांचा हात तुटू दिला नसता, मात्र ते मला घेऊन गेले नाहीत.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसबाळासाहेब थोरात