Join us

संयुक्त महाराष्ट्र चळवळ शाहिरांनी घराघरांत पोहोचविली, पवारांची डपावर थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 7:15 AM

शरद पवार यांनी दिला साबळे यांच्या आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीला संगीताचा आधार देऊन चळवळ घराघरांत पोहोचविण्याचे शाहीर मंडळींनी केले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.   प्रख्यात शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या प्रसिद्ध गीताचे अनावरण पवार यांच्या हस्ते मंगळवारी येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई इथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, बेला शिंदे, सना शिंदे आणि निर्माता संजय छाब्रिया  उपस्थित होते. शरद पवार यांनी यावेळी शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला संगीताचा आधार देऊन चळवळ घराघरांत पोहोचविण्याचे काम ज्यांनी केले. त्यामध्ये प्रामुख्याने शाहीर सगनभाऊ, शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर साबळे, शाहीर शंकरराव निकम अशी अनेकांची नावे घेता येतील. शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्र गीताने प्रत्येक व्यक्तीला एका वेगळ्या दिशेला नेण्याचे काम केले. त्यामुळे शाहीर साबळे हे राज्यातील मराठी माणसाच्या मनातील शाहीर म्हणून स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले, असे पवार म्हणाले.

‘भीमथडीच्या तट्टांना’ या ओळीचे आकर्षण ज्यावेळी मला कळले की शाहिरांच्या आयुष्यावर काही काम केले जात आहे, तेव्हा मला मनापासून आनंद झाला. तसेच शाहिरांनी गायलेले महाराष्ट्र गीत हे राज्याचे गीत म्हणून मान्य करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली या निर्णयाचाही मला आनंद झाला. महाराष्ट्र गीतामधील ‘भीमथडीच्या तट्टांना’ या ओळीचे मला अधिक आकर्षण आहे. भीमथडी म्हणजे भीमा नदीच्या काठावर वसलेले गाव. १९४७ पूर्वी त्या गावाचे नाव भीमथडी होते आणि १९४७ नंतर त्या गावाचे नाव बारामती झाले. त्यामुळे आम्हाला या गीतातून अत्यंत उत्साह येतो, असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र