नानांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'नानाछंद' अल्बमचे दिग्गजांच्या उपस्थित अनावरण
By संजय घावरे | Published: July 5, 2024 12:26 AM2024-07-05T00:26:27+5:302024-07-05T00:27:07+5:30
निसर्गातील चित्र शब्दबध्द केले - नाना पाटेकर
मुंबई - एक नट असल्याने माझ्या आत साचलेले सुख-दु:ख काव्यातून कागदावर उतरवले आहे. निसर्गात दिसलेले चित्र 'नानाछंद'च्या निमित्ताने शब्दबध्द केले आहे. डोंगराच्या सानिध्यात शेतावर राहिल्याने हे शक्य होऊ शकले. छंदबध्द लिहिता येत नसल्याने मुक्तछंदमध्ये गाणी लिहिल्याचे नाना पाटेकर म्हणाले. स्वरचित 'नाना छंद' या अल्बम प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
अभिनेता, दिग्दर्शक आणि दीन-दुर्बलांना मदतीचा हात देणारे समाजसेवक अशी जनमानसांमध्ये प्रतिमा असलेल्या नाना पाटेकर यांचे कवीरूप जगासमोर आणणाऱ्या 'नानाछंद' या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. 'नानाछंद' या अल्बममधील गाणी नानांच्या लेखणीतून अवतरली आहेत. सागरिका म्युझिकची प्रस्तुती असलेल्या 'नानाछंद'मधील गाणी संगीतकार निलेश मोहरीरने वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात संगीतबद्ध केली आहेत. सुरेश वाडकर, सचिन पिळगावकर, उत्तरा केळकर, सुदेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत 'नानाछंद'चे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे, निलेश मोहरीर, हिरक दास, सागरीका दास, विक्रम बाम यांच्यासह अभिजीत पानसे, प्रियांका बर्वे, जान्हवी अरोरा तसेच अभिनय व संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. सागरिका आज २५ वर्षांची झाल्याचे सांगत सुरेश वाडकर यांनी सागरिकासोबत केलेल्या कामाची आठवण करून दिली. 'नाना करते लिखही डाला इसने' असे नानांना उद्देशून ते म्हणाले. 'घर में है बस छहही लोग...' या नानांनी लिहिलेल्या जुन्या हिंदी गाण्याबद्दलही वाडकरांनी सांगितले.
सागरिकाच्या कुंडलीत रागयोग असल्याचे सचिन म्हणाले. सागरिकाने बऱ्याच नवीन गायक-संगीतकारांना व्यासपीठ दिले. आज त्यांच्यामुळे नाना या माझ्या मित्राचे नवीन रूप जगासमोर येणार असल्याचेही पिळगावकर म्हणाले.
उत्तरा केळकर म्हणाल्या की, १९८९ मध्ये बहिणाबाईची गाणी हा अल्बम आला. सहा-सात निर्मात्यांनी नकार दिल्यानंतर मी पतीदेवांसोबत त्या अल्बमची निर्मिती केली. पुढे १९९९ सागरिकाने वितरण केल्याने बहिणाबाईची गाणी सर्वदूर पोहोचल्याचेही त्या म्हणाल्या.
नानांच्या आवाजाची नक्कल करत सुदेश भोसले म्हणाले की, नानांसोबत अमेरिकेला गेलो होतो. आज पुन्हा ते भेटले तेव्हा त्यांनी कडकडून मिठी मारली. ही मिठी कायम स्मरणात राहील असेही ते म्हणाले.