मुंबई : प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला असून, दिवाळसणाला आपले गाव गाठण्यासाठी रेल्वेस्थानकांवर गर्दी होऊ लागली आहे. गाड्याही तुडुंब गर्दीने फुलू लागल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, वांद्रे, आदी स्थानकांत हे असे चित्र आहे.
दिवाळीत घरी जाण्यासाठी ऐनवेळी अडचण नको म्हणून अनेकांनी आरक्षण करून ठेवले आहे. तर आरक्षण न करता प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्यांना आता केवळ तत्काळ तिकिटांचा पर्यायच शिल्लक आहे. सणासुदीच्या दिवसांतील होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अनेक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. अजूनही रेल्वेकडून नियमित सेवा बंद असली तरी नागरिकांना रेल्वेचा विशेष सेवांचा आधार वाटत असल्याने या विशेष गाड्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दिवाळीत घरी जाण्यासाठी ऐनवेळी अडचण नको म्हणून अनेकांनी आधीच आरक्षण करून ठेवले आहे.
मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले हजारो प्रवासी दिवाळी, छटपूजेसाठी उत्तरेकडील त्यांच्या राज्यात परत जातात. याशिवाय अनेकजण पर्यटन, व्यवसायानिमित्त प्रवास करतात. यामुळे रेल्वेगाड्यांना खच्चून गर्दी होते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही गर्दी रोडावली होती. मात्र, यंदा कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याने दिवाळी पूर्वीप्रमाणेच धामधुमीत साजरी होईल, असे वातावरण आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रवाशांची संख्या आतापासूनच वाढली आहे.
... म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट महाग सण-उत्सवांच्या काळात प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षांत मुंबईत अनेकदा या प्रकारे दरवाढ करण्यात आली आहे.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे