भावी डॉक्टरांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आता होणार ऑनलाइन
By संतोष आंधळे | Published: June 29, 2023 12:33 PM2023-06-29T12:33:31+5:302023-06-29T12:33:50+5:30
Doctor: कर्नाटक येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धर्तीवर आता राज्यातही आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व मेडिकल कॉलेजांतील पेपर तपासणीचे काम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
- संतोष आंधळे
मुंबई - कर्नाटक येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धर्तीवर आता राज्यातही आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व मेडिकल कॉलेजांतील पेपर तपासणीचे काम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार असून निकाल वेळेवर लागण्यासाठी मदत होईल, असा आरोग्य विद्यापीठाचा दावा आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत सर्व पॅथीची मिळून ५३६ महाविद्यालये आहेत.
ऑनलाइन पद्धतीने पेपर तपासणीचे काम कसे चालते याचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापाठीच्या काही अधिकाऱ्यांनी नुकताच कर्नाटकचा दौरा केला. पेपर तपासणीत मानवी हस्तक्षेप कमी होऊन निकाल वेळेत लागण्याच्या दृष्टीने या यंत्रणेचा फायदा असल्याचे दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑनलाइन पेपर तपासणीची चाचणी काही महिन्यांपूर्वी बीडीएस (डेंटल) आणि एमबीबीएसच्या पुरवणी परीक्षांच्या वेळी करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल दोन दिवसांत लागले होते. या कामासाठी अनुभव असलेल्या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून त्यावर सर्व नियंत्रण विद्यापीठाचे असेल. राज्यात २८ पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयांत २,८२० विद्यार्थी आहेत.
राज्य शासनाची महाविद्यालये
प्रकार कॅालेज विद्यार्थी संख्या
एमबीबीएस २३ ३७५०
डेंटल ३ २५१
आयुर्वेद ६ ६६३
युनानी ० ०
होमिओपॅथी १ ६३
फिजिओथेरपी १ ३०
नर्सिंग ५ २५०
सध्या पदव्युत्तर परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे काम ऑनलाइन पद्धतीने तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच पॅथीच्या परीक्षांचे पेपर या पद्धतीने तपासले जातील. २०२३-२४ नंतरच्या सर्व परीक्षांसाठी या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. काही कारणांमुळे पेपर तपासणीचे काम मंगळवारी थांबविण्यात आले होते. मात्र परीक्षा नियंत्रकांशी बोलणे झाले असून लवकरच स्कॅनिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ