मुंबई - जुन्या तबल्यांपासून अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित कलाकृती कलाकार सीमा लिसा पांड्या यांनी साकारल्या आहेत. मुंबई गॅलरी वीकेंड अंतर्गत आयोजित प्रदर्शनात नरिमन पाॅईंट येथील कमलनयन बजाज कला दालनात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १० फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते ७ या वेळेत खुले राहणार आहे.
कलाकार सीमा लिसा पांड्या यांचे देशातील हे पहिलेच एकल प्रदर्शन आहे. वेगवेगळ्या वादकांनी वादनासाठी वापरलेल्या तबल्यांचा वापर सीमा यांनी आपल्या कलाकृतींत केलेला आहे. दीर्घकाळ या तबल्यांचा संग्रह करुन यावर सीमा यांनी काजळ आणि कोळशाच्या शाईने अत्यंत सुबक अशा कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृतींच्या माध्यमातून निसर्गाशी कलाकाराची असलेली एकरुपता आणि स्थानिक संसाधनांना दिलेले प्राधान्य प्रतित होते अशी भावना सीमा यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. प्रदर्शनाविषयी सीमा यांनी सांगितले, माझ्या गुरुंकडे तबला शिकत असताना त्यांनी आयुष्यात सगळ्या गोष्टींत स्पंदने आहे असे सांगितले होते, आणि मग काळ बदलल्यानंतर ही मूळ संकल्पना माझ्या कलासक्त मनात कायम राहिली आणि रुजत गेली. गुरुंनी सांगितलेल्या या संकल्पना मूर्त स्वरुपात कला रुपात आणण्यासाठीची हा छोटा प्रयत्न आहे.
प्रदर्शनातील प्रत्येक तबल्याची एक विशेष कहाणी आहे. या तबल्यांच्या कलात्मक रचनेतून वैशिष्ट्यपूर्ण स्पंदने आणि ध्वनीची निर्मिती केली जाते. कला दालनाच्या प्रत्येक भितींवर विशिष्ट पद्धतीने केलेली तबल्यांची रचना कलारसिकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे, शिवाय तबले संग्रह करण्यासाठी कलाकाराने घेतलेली धडपडही कलासक्त व्यक्तींसाठी कौतुकास्पद आहे. हे संपूर्ण प्रदर्शन डॉ. आर्शिया लोखंडवाला यांनी क्युरेट केले आहे.