Join us

दहा वस्त्या अन् पाड्यांचं गाव...दहिसर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 4:13 PM

गोष्ट एका गावाची. हे गाव मुंबईत आहे, मुंबई महापालिकेच्या हद्दीत आहे; पण मुंबईकरांना ते लांब वाटतं.

संजीव साबडे, मुक्त पत्रकार

गोष्ट एका गावाची. हे गाव मुंबईत आहे, मुंबई महापालिकेच्या हद्दीत आहे; पण मुंबईकरांना ते लांब वाटतं. बाहेरगावी रस्त्याने जाताना आणि बाहेरगावहून परतताना तुमचं वाहन इथं थांबवलं जातं, तिथं टोल भरावा लागतो. त्यामुळे हे गाव मुंबईबाहेर आहे, अशी अनेकांची धारणा आहे. हे मुंबईतलं शेवटचं स्टेशन आहे; पण इथून एकही गाडी सुटणार नाही वा एकही लोकल रेल्वेचा प्रवास इथून सुरू होत नाही.

मुंबई महापालिकेत असलेली अन्य उपनगरे पूर्वीपासून मुंबईचा भाग मानली जायची; पण हे गाव तेव्हा होतं ठाणे जिल्ह्यात. ते सुमारे ६५ वर्षांपूर्वी मुंबईत आले. हे गाव म्हणजे दहिसर.

दहिसर हे दहा पाड्यांचं गाव आहे. दहा पाडे आणि वस्त्यांमुळे या गावाला दहिसर हे नाव पडले, असे सांगितले जाते. कांदरपाडा, ओवरी पाडा, केतकी पाडा, रावळ पाडा, दहिवली, वडारी पाडा, दागली पाडा, गावठाण,  घर्तन पाडा आणि नवगाव अशी या वस्त्या आणि पाड्यांची नावे. आजही तो संबंधित भाग याच नावाने ओळखला जातो, हे विशेष.

आगरी, कोळी आणि पाचकळशी समाजातील लोकांची इथं प्रामुख्याने वस्ती होती आणि आहे; पण आता उत्तर भारतीय आणि विशेषतः गुजराती यांची लोकसंख्या वाढली आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड इथं गुजराती मोठ्या प्रमाणात राहतात. गुजरातला जोडून असलेला थेट मुंबईचा भाग असणं हे त्यामागचं कारण. दहिसरला रेल्वेस्टेशन झाल्यानंतर कोकणातून (आताचा सिंधुदुर्ग जिल्हा) अनेक लोक मुंबईला आणि तिथून दहिसरला आले. त्यांच्या म्हात्रे कॉलनी आणि मराठा कॉलनी या वसाहती आजही येथे आहेत. 

- आता दहिसर पूर्वेचे डोंगर चांगलेच भुईसपाट झालेत. पूर्वी इथं जकात नाका होता. - त्यामुळे दहिसरच्या हायवेवर आणि शेजारी रेस्टॉरंट, बार, डान्सबार, ढाबे यांबरोबर काही वाईट धंदेही उघडपणे चालतात. - वर्दळ तर सदासर्वकाळ असतेच. वाहतूककोंडीही कायम. त्या तुलनेत दहिसर पश्चिम शांत लोकवस्तीचं ठिकाण आहे. 

नदी मृतवत - मुंबईतील सर्वच नद्या आता मृत झाल्या आहेत.  दहिसर नदीही त्याच दिशेने चालली आहे. - ती जिवंत करण्याचे, तेथील गाळ काढण्याचे अधूनमधून प्रयत्न होतात, थोडं कामही होते त्या दिशेने. - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलावातून ही नदी उगम पावते. - या परिसरात पूर्वी चित्रपट शूटिंग होत असे मात्र, २००५ च्या पावसात नदीने १०० हून अधिक बळी घेतले होते.

टॅग्स :मुंबई