क्रिकेटच्या मैदानावर गुंजणार बालहक्काचा आवाज; आयसीसी - युनिसेफची भागीदारी
By स्नेहा मोरे | Published: November 2, 2023 07:11 PM2023-11-02T19:11:14+5:302023-11-02T19:11:21+5:30
लिंग समानता, मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलींना समान संधी असा संदेश देत आतापर्यंत देशभरातून ४० हजार लोकांनी यासंबंधी प्रतिज्ञा घेतली आहे.
मुंबई - देशातील क्रिक्रेटवरील प्रेम पाहून क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेऊन या माध्यमातून बालहक्कांना साद घालण्यासाठी युनिसेफ जागतिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप २०२३ च्या पार्श्वभूमीवर क्रिकेटद्वारे इंटरनॅशल क्रिकेट काऊन्सिलशी हा सामाजिक संदेश देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
लिंग समानता, मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलींना समान संधी असा संदेश देत आतापर्यंत देशभरातून ४० हजार लोकांनी यासंबंधी प्रतिज्ञा घेतली आहे. युनिसेफच्या देश प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे यांनी याबाबत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याप्रसंगी, क्रिकेटचा खेळ खूप लोकप्रिय असून त्यामाध्यमातून मुलांच्या प्रश्नांबद्दल जनजागृती करण्यात येणार असल्याचे सिंथिया यांनी सांगितले. तसेच, क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती मुलांमध्ये यावी, आपल्या चुकांमधून नवीन गोष्टी शिकता याव्यात, मुलींनाही खेळाची संधी मिळावी, मुलगा-मुलगी भेद करू नये,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. क्रिकेटच्या माध्यातून मुलांच्या प्रश्नांबद्दल, लिंग समानतेबद्दल आणि मुलींना संधी देण्याबद्दल कायम जागरुकता करत असतो. देशात ‘वन डे फॉर चिल्ड्रन’ हा उपक्रम राबवण्यात येत असून अम्बेसेडर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि मुथया मुरलीधरन हेसुद्धा सहभागी होणार आहेत. भारत आणि श्रीलंका मॅचच्या वेळी संपूर्ण वानखेडे स्टेडियम निळ्या रंगामध्ये रंगले त्यातून लोकांना मुलांच्या प्रश्नांविषयी माहिती मिळण्यास मदत झाली.
प्रत्येक भारतीयाने घ्यावा सहभाग
प्रत्येक भारतीयाने मुलांच्या हितासाठी प्रतिज्ञा करावी, असे आवाहनही सिंथिया यांनी केले. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देऊ, बालविवाह आणि मुलांवर होणारी हिंसा याविरोधात उभे राहू, माझ्या कुटुंबामध्ये सर्वजण एकत्र जेवतील, मुलगा आणि मुलगी दोघेही एकत्र शाळेत जातील आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करतील, मुलांच्या भविष्यासाठी या पृथ्वीचे रक्षण करीन या प्रतिज्ञांचा समावेश या उपक्रमात आहे.
चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता अन् आनंद
उपक्रमाच्या निमित्ताने वानखेडे येथील क्रिकेट सामना पाहण्याची संधी मिळालेल्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि उत्सुकता दिसून येत होती. तसेच, पहिल्यांदाच स्टेडिअमध्ये सामना पाहायला मिळणार, खेळाडूंना भेटण्याची संधी आणि हक्कांसाठी उचललेले पहिले पाऊल याविषयीही आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.