ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेटीची प्रतीक्षा संपली; ९३.५६ कोटींची निविदा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:16 AM2022-11-02T07:16:49+5:302022-11-02T07:16:59+5:30

प्रकल्पाला नवीन वर्षात होणार सुरुवात

The wait is over for a floating jetty at the historic Janjira Fort! | ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेटीची प्रतीक्षा संपली; ९३.५६ कोटींची निविदा मंजूर

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेटीची प्रतीक्षा संपली; ९३.५६ कोटींची निविदा मंजूर

Next

- गणेश चोडणेकर

आगरदांडा :  ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेटीची प्रतीक्षा आता संपली असून, पर्यटकांचा धोकादायक प्रवास आता थांबणार आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस लाटरोघक भिंत आणि जेटी बांधण्यासाठी ९३ कोटी ५६ लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. या कामाला नवीन वर्षात सुरुवात होणे अपेक्षित आहे. 

जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्यावेळी शिडाच्या बोटी किल्ल्याजवळ पोहोचता तेव्हा प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खातात. यावेळी मोठी कसरत करून पर्यटकांना सुरक्षित बोटीतून उतरावे लागते. यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना तर तारेवरची कसरत करावी लागते. 

२०१८ च्या एप्रिल महिन्यात नाशिक येथील पर्यटक महिलेने उडी मारल्यामुळे पायाचे हाड मोडण्याची घटना घडली होती. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र तरंगती जेटी बनविण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून होता. आता या जेटीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
सागरमाला योजनेंतर्गत किल्ल्याच्या पश्चिमेकडे जेटी बनवण्याची परवानगी मिळाली असून, ५०० पर्यटक सुरक्षित उतरतील, अशी भव्य जेटी बनविण्यात येणार आहे.  

समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी २५० मीटर लांबीची लाटरोघक भिंतही उभारण्यात येणार आहे. यासाठी ९३ कोटी ५६ लाख रुपये अपेक्षित असून, या बांधकामासाठी पुरातत्व विभागाने मंजुरी दिली आहे.जेटीच्या कामाची निविदा निघून ती मंजूर करण्यात आली आहे. नवीन वर्षात कामाला सुरुवात होईल. पुढील दोन वर्षांत जेटीचे काम पूर्ण होईल.

लाटांची तीव्रता पाहून निवडली जागा

मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या पर्यटक किल्ल्यात जातात ते किल्ल्याचे मागील प्रवेशद्वार आहे. किल्ल्याचा मुख्य प्रवेश पश्चिमेला असल्याने पुरातत्व विभागाने व तज्ज्ञांनी मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून समुद्राच्या लाटांची तीव्रता पाहून ही जागा निवडली आहे. 

पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर जेटी

पश्चिमेकडील प्रवेशद्वार मोठे व  ६००/१०० फुटांचा धक्का असल्याने जेटी बनविण्यास सुलभ होईल. राजपुरीकडून दिसणाऱ्या किल्ल्याचा सुंदरतेचा कोणतीही बाधा येणार नाही. या जेटीचे बांधकाम मेरीटाइम बोर्डाचे तज्ज्ञ पथक करणार आहे. सर्व संभाव्य त्रुटींचा विचार करून जेटीचे सुरक्षित व वापरण्यास सहज सोपे असे बांधकाम  होईल. किल्ल्याच्या पश्चिमेकडे प्रशस्त दगडी बांधकाम केलेले ग्राउंड असल्याने पर्यटकांना तेथे बसून निसर्गरम्य विशाल समुद्राचा मनसोक्त आनंद घेता येईल, असे  मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी सांगितले.

Web Title: The wait is over for a floating jetty at the historic Janjira Fort!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.