लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात विनासायास जाता यावे, यासाठी मध्य रेल्वेने २०२ फेऱ्या सुरू केल्या असून, याचे आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटांतच फुल्ल झाल्याची माहिती आता पुढे येत आहे. पहिल्या काही मिनिटांतच आरक्षण करण्यासाठी प्रयत्न करूनही अनेकांना साडेसातशे प्रतीक्षा यादीवर राहावे लागल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनांकडून देण्यात आली.
मुळात कोकणातल्या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात विनाअडचण जाता यावे, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनांकडून मध्ये रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने जादा गाड्या सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासन या मागणीकडे गांभीर्याने पाहात नाही. दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर महिन्यातील २०२ फेऱ्यांच्या नवीन वेळापत्रकाबरोबरच रविवारी या गाड्यांसाठी आरक्षण सुविधा सुरू होईल, असे जाहीर केले होते. पण रविवारी सकाळी गाड्यांचे आरक्षण सुरू होताच, पहिल्या काही मिनिटांतच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. दरम्यान, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाला प्रवासी संघटनांकडून निवेदन देत याबाबत कारवाई करण्याची मागणीही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथून सुटणार गाड्या...मध्य रेल्वे प्रशासनाकडून सप्टेंबर महिन्यात २०२ रेल्वे गाड्या कोकणासाठी सोडल्या जाणार असून, या सगळ्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दिवा येथून सुटणार आहेत.
तिकिटे कोणी काढली?मुळात या गाड्यांचे आरक्षण करताना दलाल मध्यस्थी करत असल्याने मूळ प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण मिळत नाही, याकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी लक्ष वेधले आहे.विशेषतः ज्या गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे किंवा ज्या प्रवाशांनी आरक्षण केले आहे; अशांची एक यादी रेल्वे प्रशासनाने जाहीर करावी. जेणेकरून ही तिकिटे कोणी काढली आहेत? हे समजण्यास मदत होईल, याकडे कोकण रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजू कांबळे यांनी लक्ष वेधले आहे.