केईएम रुग्णालयात केस पेपरसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करावा
By संतोष आंधळे | Published: May 14, 2024 10:28 PM2024-05-14T22:28:16+5:302024-05-14T22:28:23+5:30
आयुक्त भूषण गगराणी यांचे रुग्णालय प्रशासनाला निर्देश
मुंबई: केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा ओघ अधिक असतो. या परिस्थितीत रुग्णांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी बाह्य रुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नेमावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
केईएम रुग्णालयाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच रुग्णालयातील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी गगराणी यांनी मंगळवारी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी त्यांनी रुग्ण खिडकीजवळ रुग्णांशी संवाद साधत असताना त्यांनी केस पेपर संदर्भातील निर्देश दिले. पाहणी दरम्यान आयुक्तांनी रुग्णालयाच्या विविध कक्षातील सुविधांची बारकाईने पाहणी केली.
सध्या रुग्णालयात सहा कक्षांची कामे सुरू आहेत. त्याचीही त्यांनी माहिती घेतली. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केईएम रुग्णालयात शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा देखील सविस्तरपणे गगराणी यांनी आढावा घेतला. जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे रुग्णालयात आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रशासनाने सहभागी होण्यासाठी सूचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केईएम रुग्णालय पुनर्विकास अंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सर्व्हीस टॉवर, कर्मचारी भवन, परिचारिका वसतिगृह या इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी गगराणी यांनी दिले.