खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम १० दिवसांत होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:22 PM2023-10-12T13:22:26+5:302023-10-12T13:22:39+5:30
खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम १० दिवसांत पूर्ण करून तीन फूट अंतराची पायवाट पादचाऱ्यांना रहदारीसाठी मोकळी करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेने दिली आहे.
मुंबई : महापालिका मुख्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर असणाऱ्या खाऊगल्लीनजीक काही प्रकल्पांची कामे सुरू असल्याने या भागात येणाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी खाऊगल्लीत चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेने पावले उचलली आहेत. खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम १० दिवसांत पूर्ण करून तीन फूट अंतराची पायवाट पादचाऱ्यांना रहदारीसाठी मोकळी करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेने दिली आहे.
‘लोकमत’च्या ९ ऑक्टोबरच्या अंकात ‘खाऊगल्लीत चेंगराचेंगरी?’ अशी फोटोसह बातमी प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची पालिकेने दखल घेतली आहे. या ठिकाणी पालिकेच्या ‘ए’ विभागाचे रस्ते अभियंता, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रकल्प अधिकारी आणि ए.सी.सी. कंपनीचे प्रकल्प अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी केली. त्यानंतर खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम १० दिवसांत पूर्ण करून तीन फूट अंतराची पायवाट पादचाऱ्यांना रहदारीसाठी मोकळी करून देण्यात येईल. जेणेकरून या ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा येणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.