...तर हंडे, घागरी घेऊन रस्त्यांवर उतरावे लागेल; पावसाच्या दमदार हजेरीकडे लागले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 10:45 AM2023-09-03T10:45:27+5:302023-09-03T10:45:35+5:30
तीन तलावांमधील पाणीसाठ्याची क्षमता पुन्हा १०० टक्क्यांखाली आली आहे.
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत आज पाणी असले तरी येत्या १५ दिवसांत पाऊस झाला नाही तर मुंबईकरांनाही हंडे, घागरी घेऊन पाण्यासाठी रस्त्यांवर उतरावे लागणार आहे. पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पाणी कपातीसाठी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. जुलैमध्ये चार तलाव पूर्ण भरले होते. यातील तीन तलावांमधील पाणीसाठ्याची क्षमता पुन्हा १०० टक्क्यांखाली आली आहे.
किती पाणी लागते?
सातही तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे.
तलावांतून दररोज मुंबईला ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
सध्या १३ लाख १२ हजार दशलक्ष लिटर म्हणजेच ९०.६५ टक्के पाणीसाठा आहे.
गेल्यावर्षी याच कालावधीत ९७.५१ टक्के पाणीसाठा होता.
१ ऑक्टोबर का?
१ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी जलसाठाबाबत १०० टक्के समाधान व्यक्त केले जाते. ऑक्टोबर महिन्यातील साठा किती असेल ? त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते.
किती टक्के पाणीसाठा
तुळशी ९९.६६ टक्के
विहार तलाव १०० टक्के
तानसा ९८.७७ टक्के
मोडक सागर ९७.६१ टक्के
अप्पर वैतरणा-७८.३९
मध्य वैतरणा-९७.६१
भातसा-८९.६०
७ तलावात ९० टक्के पाणीसाठा असून, हे पाणी मेपर्यंत पुरेल. १० ते १५ सप्टेंबरदरम्यान साठ्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाईल.
- पुरुषोत्तम माळवदे, जल अभियंता, मुंबई पालिका