रेसकोर्सवर ‘सेंट्रल पार्क’च्या उभारणीचा मार्ग अखेर मोकळा; १२० एकरांचा भूखंड पालिकेकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 08:34 AM2024-07-04T08:34:36+5:302024-07-04T08:35:21+5:30

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत करार, रेसकोर्स भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर एकूण भूखंडापैकी १२० एकर सरकारच्या माध्यमातून पालिकेच्या ताब्यात देण्यास सरकारने अलीकडे मान्यता दिली

The way for the construction of 'Central Park' on the race course is finally clear; 120 acres plot with BMC municipality | रेसकोर्सवर ‘सेंट्रल पार्क’च्या उभारणीचा मार्ग अखेर मोकळा; १२० एकरांचा भूखंड पालिकेकडे

रेसकोर्सवर ‘सेंट्रल पार्क’च्या उभारणीचा मार्ग अखेर मोकळा; १२० एकरांचा भूखंड पालिकेकडे

मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सवरील सुमारे १२० एकर क्षेत्र आणि त्यासोबतच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील सुमारे १७५ एकर क्षेत्र अशा एकंदर ३०० एकरांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेसकोर्स भूखंडावरील ९१ एकर ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळे १२० एकर जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे.

रेसकोर्स येथील २११ एकरांचा भूखंड १०० वर्षांपासून टर्फ क्लबला कराराने दिला होता. या जागेचा भाडेपट्टा करार काही वर्षांपूर्वी संपल्यानंतर हा भूखंड नागरी हिताच्या दृष्टीने ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. यासाठी विविध कायदेशीर बाबी, वैधानिक आव्हाने आणि प्रशासकीय अडचणी यातून सर्वमान्य होईल असा मार्ग काढणे ही सर्वांत आव्हानात्मक बाब होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, विद्यमान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी, तसेच उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड आणि मालमत्ता विभागाने या विषयाचा सखोल अभ्यास आणि पाठपुरावा करून सर्वमान्य तोडगा काढण्यात यश मिळविले. त्यामुळे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ आता प्रत्यक्षात साकारणे शक्य होणार आहे.

रेसकोर्स भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर एकूण भूखंडापैकी १२० एकर सरकारच्या माध्यमातून पालिकेच्या ताब्यात देण्यास सरकारने अलीकडे मान्यता दिली. उर्वरित ९१ एकर भूखंड टर्फ क्लबला भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. हा भाडेपट्टा करार १ जून २०२३ पासून ते ३१ मे २०५३ या ३० वर्षांच्या कालावधीसाठी आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर या भाडेपट्टा करारावर शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख होणार ठळक

  • ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित झाल्यामुळे मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक ठळक होईल. 
  • मुंबईचे सध्या अस्तित्वात असणारे ३ हजार ९१७ एकर हरित क्षेत्र वाढून ते ४ हजार २१२ एकर इतके होईल. 
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकूण ३०० एकरांवरील हरित क्षेत्र हे मुंबईच्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात मोलाचे योगदान ठरेल.

Web Title: The way for the construction of 'Central Park' on the race course is finally clear; 120 acres plot with BMC municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.