मुंबई : बोरीवली पूर्व येथील नॅशनल पार्कजवळील श्रीकृष्णनगरमधील दहिसर नदीवरील वाहतूक पूल धोकादायक बनला असून, या पुलाची तातडीने बांधणी केली जात आहे. वन विभागाच्या परवानगीअभावी या पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम काही अंशी रखडले होते. मात्र, आता वन विभागाची परवानगी मिळाली असून, या कामाला गती मिळणार आहे. श्रीकृष्णनगर पुलाची ‘वाट’ मोकळी झाली आहे. हा पूल तयार झाल्यानंतर येथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्ग, श्रीकृष्णनगर, नागरी प्रशिक्षण संस्था, संशोधन केंद्र, अभिनवनगर, शांतिवन या भागाला जोडणारा तसेच परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव पूल आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हा पूल लवकरात लवकर पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्णनगर या पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पालिका अधिकाऱ्यांकडून पुलाची पाहणी केल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये जुना पूल पाडून विस्तारीकरण व पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले होते. पुलाचे बांधकाम इंटिग्रेटेड डेक स्लॅब व ब्रीज पिलर पद्धतीने करण्यात येत आहे. पहिला टप्पा ११ मीटर रुंदीचा असून, त्याचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे आणि एक मार्गिका सुरू करण्यात आली.
दुसऱ्या टप्प्याला गती :
पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील पुलाच्या कामाचा काही भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक होते. त्यासाठी पालिकेकडून सल्लागाराची नेमणूक ही करण्यात आली. आता वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११.३० मीटर रुंदीच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
असा आहे पूल?
पुलाची एकूण लांबी : ४१.५ मीटर उत्तर व दक्षिण वाहिनीसाठी प्रत्येकी २ मार्गिका स्पॅन लांबी १३.५० मीटर, १३.६० मीटर आणि १३.५० मीटर पुलासाठी २००० घन मीटर काँक्रीट डांबर ३०० मेट्रिक टन लोखंड (रिइन्फोर्समेंट) ४९० मेट्रिक टन