मुंबई : देशातील गृहनिर्माण क्षेत्रातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आता देशातील गर्भश्रीमंत लोकांनी गुंतवणुकीसाठी घर खरेदीला प्राधान्य दिल्याची माहिती नाईट फ्रँक या बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. ज्यांची वार्षिक आर्थिक उलाढाल काही शे कोटींच्यावर आहे. अशा लोकांनी त्यांच्या गुंतवणुकीपैकी ३२ टक्के रक्कम ही घर खरेदीत गुंतवली असल्याचे दिसून आले आहे.
या लोकांचा घर खरेदीमधील वाढता कल पाहून अनेक विकासकांनी आलिशान प्रकल्पांची निर्मिती सुरू केली आहे. यामध्ये घरासोबत अनेक पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबईत गेल्यावर्षभरात एकूण दीड लाख घरांची विक्री झाली. यामध्ये ज्या घरांची किमान किंमत ५ कोटी आहे.
अशा घरांचे एकूण विक्रीतील प्रमाण हे ३७ टक्के इतके होते, तर मुंबईत गेल्यावर्षी १०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री देखील लक्षणीय झाली होती. मलबार हिल, वरळी, वांद्रे, जुहू आदी परिसरात १०० कोटी रुपयांचे फ्लॅट व बंगले विकले गेले आहेत. एकट्या बॉलीवूड उद्योगाने गेल्यावर्षी मुंबईत ३७२ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.