मुंबई : उत्तर भारताच्या टोकावर हिमवृष्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, या हिमवृष्टीमुळे गार वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणखी वेगाने वाहू लागतील. या गार वाऱ्यांचा प्रभाव म्हणून मध्य भारतासह उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात आणखी घसरण होईल. परिणामी थंडीचा कडाका आणखी वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली. दरम्यान, मुंबईचे किमान तापमान पुन्हा एकदा किंचित घसरले असून, गुरुवारी नोंदविण्यात आलेल्या १६ अंश तापमानामुळे मुंबईकरांना किंचित का होईना गारव्याचा आनंद लुटता येत आहे.
येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हयांत आल्हाददायक हवामान राहील. मुंबईचे किमान तापमान १३ ते १४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. मुंबईच्या उपनगरांत म्हणजे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे परिसरात किमान तापमान ११ ते १२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. दिवसाचे कमाल तापमान २८ अंशांच्या आसपास राहील.