लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वीकएण्डबरोबरच सुट्यांचा मे महिना संपत असल्याने अनेकांनी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग केले असेल तर आधी लोकलचे वेळापत्रक पाहा. मध्य रेल्वेवर शुक्रवार, शनिवार आणि रविवार अनुक्रमे ३१ मे, १ जून आणि २ जून या दिवशी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीत मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या ९३० फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे वीकएण्डचा बोऱ्या वाजणार आहे.
सीएसएमटी येथील फलाटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी हा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होऊन ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. दरम्यान, या काळात नोकरदारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’ करू देण्याची विनंती मध्य रेल्वेने अनेक आस्थापनांना केली आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून बेस्ट आणि एसटीकडून जादा गाड्या सोडण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
शेवटची लोकल कधी?
रात्री उशिरा उपनगरांमध्ये परतणाऱ्या नोकरदारांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलले असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी अखेरची लोकल रात्री १२:१४ वाजता सुटणार आहे.
जम्बोब्लॉक का?
- सीएसएमटी येथे २४ डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबविता याव्यात म्हणून फलाट क्रमांक १० आणि ११ चा विस्तार केला जात आहे.
- गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या, मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्स्प्रेस रद्द तर अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
- आता याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे.
- मध्य रेल्वे मार्गावर दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. मात्र आता तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द होतील.
बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही रद्द
१ आणि २ जून (अप गाड्या) : पुणे- सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड- सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, जालना- सीएसएमटी वंदे भारत एकस्प्रेस, धुळे- सीएसएमटी एक्स्प्रेस, जालना- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, साई नगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव- सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, कोल्हापूर- सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी राज्य राणी एकस्प्रेस, जबलपूर- सीएसएमटी गरीब रथ एक्स्प्रेस.
१ आणि २ जून (डाऊन गाड्या) : सीएसएमटी-नांदेड तपोवन एकस्प्रेस, सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी- सोलापूर वंदे भारत एकस्प्रेस, प्रगती एकस्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, राज्य राणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस.
- ब्लॉक : ठाणे येथे ६३ तर सीएसटीला ३६ तासांचा ब्लॉक
- कालावधी : गुरुवार/शुक्रवार मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारपर्यंत
- ३३ लाख प्रवाशांचे हाल
- शुक्रवारी १६१, शनिवारी ५३४ आणि रविवारी २३५ फेऱ्या रद्द