मुंबई : चित्रपट निर्माते मुश्ताक नाडियादवाला यांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या ठावठिकाणांची माहिती पाकिस्तानने दिली नसल्याचे केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले. २०२० पासून नाडियादवाला यांची पत्नी पाकिस्तानात तिच्या माहेरी गेली आहे. तिचा तसेच दोन अल्पवयीन मुलांचा ठावठिकाणा कळत नसल्याने नाडियादवाला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नाडियादवाला यांचा मोठा मुलगा नऊ तर धाकटा मुलगा सहा वर्षांचा आहे. या दोघांनाही पाकिस्तानातून भारतात सुरक्षित परत आणण्यासाठी नाडियादवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. एस. बी. शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. यावेळी केंद्र सरकारने न्यायालयात एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार, केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारकडे मुलांच्या ठावठिकाण्याची, त्यांच्या नागरिकत्वाची व व्हिसाची चौकशी केली.
ऑक्टोबर २०२२ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये पाक सरकारला याबाबत रिमाइंडर पाठवले. मात्र, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. भारतीय दूतावास संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करील, असे केंद्राने स्पष्ट केले. केंद्र सरकारचा अहवाल वाचून न्यायालयाने नाडीयादवालांच्या याचिकेवरील सुनावणी २८ मार्च रोजी ठेवली.