शिवसेनेचं व्हिप आम्हाला लागू होत नाही; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले, मुंबईकडे निघाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 06:30 PM2022-07-02T18:30:19+5:302022-07-02T18:31:26+5:30

शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आलं आहे. 

The whip issued by Shiv Sena does not apply to us, said Chief Minister Eknath Shinde. | शिवसेनेचं व्हिप आम्हाला लागू होत नाही; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले, मुंबईकडे निघाले!

शिवसेनेचं व्हिप आम्हाला लागू होत नाही; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले, मुंबईकडे निघाले!

Next

मुंबई- संपूर्ण देशाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, असे समीकरण महाराष्ट्रात आल्यानंतर आता भाजपने आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पाेहाेचलेले ॲड. राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेनेही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आलं आहे. 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींना मतदान करण्याचे आदेश प्रतोद सुनिल प्रभू यांनी दिले आहेत. सुनिल प्रभू यांनी एक पत्र जारी करुन शिवसेनेच्या आमदारांना हे निर्देश देण्यात आले आहे. मात्र हे व्हिप आम्हाला लागू होत नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. 

शिवसेनेने जारी केलेला व्हिप आम्हाला लागू होत नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचं संख्याबळ आहे. आम्ही बहुमत सिद्ध करु, असं एकनाथ शिंदे यांनी गोवा विमानतळावरुन मुंबईसाठी निघताना सांगितलं. शिंदे गटातील बंडखोर आमदार हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. सुरुवातीला गुजरात, आसाम मग गोवा असा प्रवास करुन हे सर्व आमदार मुंबईत परतणार आहेत. 

दरम्यान, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी देत भारतीय जनता पार्टीने जे धक्कातंत्र अवलंबिले, ते मंत्रिपदांची संधी देतानाही वापरले जाईल, असे आता म्हटले जात आहे. त्यामुळे पक्षातील एक-दोन दिग्गज, प्रस्थापितांना विश्रांती दिली जाऊ शकते. मंत्रिमंडळात हमखास समावेश होणार म्हणून ज्यांची नावे माध्यमांतून दिली जात आहेत, त्यांना भूकंपाचा तडाखा बसू शकतो. विशेषत: नार्वेकर यांना अनपेक्षितरित्या संधी दिली गेल्याने प्रस्थापितांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सासरे सभापती, जावई अध्यक्ष?

भाजप-शिंदे गटाकडील संख्याबळ लक्षात घेता, नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जाते. या निमित्ताने एक वेगळाच योगायोग साधला जाणार आहे. नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक- निंबाळकर हे महाराष्ट विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे सासरे विधान परिषदेचे सभापती, तर जावई विधानसभेचे अध्यक्ष असा अपूर्व योग जुळून येऊ शकतो. निंबाळकर यांच्या कन्या सरोजिनी या नार्वेकर यांच्या पत्नी आहेत.

Web Title: The whip issued by Shiv Sena does not apply to us, said Chief Minister Eknath Shinde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.