अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही, रोहित पवारांचा भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 04:15 PM2022-05-12T16:15:40+5:302022-05-12T16:30:59+5:30
भाजपा महाराष्ट्रानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहे
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असल्याचं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं. शरद पवारांचा एखादाच फोटो देवासमोर हात जोडलेला किंवा नारळ फोडलेला सापडेल, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे देवासमोरील अनेक फोटो सोशल मीडियातून शेअर केले. आता, पुन्हा एकदा शरद पवार यांचा एका कार्यक्रमातील अर्धवट व्हिडिओ शेअर करुन ते नास्तिक आणि देवद्रोही असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे.
भाजपा महाराष्ट्रानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहे. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा, असा टोलाही भाजपने लगावला होता. भाजपच्या या टिकेला आता राष्ट्रवादीने शरद पवारांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. तर, रोहित पवार यांनी भाजपवर घणाघात केला आहे.
भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.
झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता..
— NCP (@NCPspeaks) May 12, 2022
भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही..
निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती. pic.twitter.com/MYSjSKj9Gq
अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीला ठेचण्यासाठी संत ज्ञानोबा माउलींपासून संत तुकोबा, संत गाडगेबाबा, शाहू-फुले-आंबेडकरांपर्यंत सर्वच महामानवांनी सामाजिक चळवळ उभी केली. अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, जवाहर राठोड यांसारख्या साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून अस्पृश्यतावादी मानसिकतेवर आपल्या लेखणीतून घणाघात केला आणि समाजाला अन्यायाची जाण करून दिली. राजकीय आरोप करण्यासाठी भाजपने शरद पवारांनी दिलेल्या संदर्भाची मोडतोड करून नास्तिकता शोधली, परंतु त्याच संदर्भात अस्पृश्यतेवर केलेला घणाघात भाजपला दिसला नाही, हीच भाजपची खरी मानसिकता आहे, अशा शब्दात रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
जवाहर राठोड यांच्या कवितेच्या संदर्भास नास्तिकतेचे नाव देऊन भाजपने त्यांची खरी मानसिकता तर दाखवलीच आहे शिवाय समाज सुधारणा चळवळीचा देखील अपमान केला आहे. मुळात देव आणि धर्म यांना भाजपा नेहमीच केवळ आणि केवळ राजकारणाच्या चष्म्यातून बघत असल्याने खरा देव आणि खरा धर्म भाजपला कधी कळला नाही आणि कधी कळणारही नाही. त्यामुळेच पुरोगामी समाजसुधारकांना भाजपने आजवर नेहमीच पाण्यात पाहिले आहे, असेही रोहित यांनी म्हटले.
मनुवृत्तीची डाळ शिजणार नाही
सर्वच समाजसुधारकांच्या काळात देखील अशा मनुवृत्ती होत्या आणि त्या मनुवृत्तींनी नेहमीच या सर्व समाजसुधारकांचा विरोध केला. आज माऊली, तुकोबा, गाडगेबाबा हे महापुरुष असते तर त्यांना देखील नास्तिक म्हणून भाजपने हिणवले असते. कारण, हाच भाजपचा खरा विचार आणि चेहरा आहे, असे म्हणत रोहित पवारांनी भाजपवर घणाघाती टिका केली. तसेच, असो, हा महाराष्ट्र आहे.. इथे तुमच्या मनुवृत्तीची डाळ कधीही शिजणार नाही, त्यामुळे आता तरी सुधरा!, अशा शब्दात इशाराही दिलाय.
राष्ट्रवादीचं व्हिडिओतून प्रत्युत्तर
शरद पवारांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, हा व्हिडिओ अर्धवट असून भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार करत राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानुसार, शरद पवारांनी भाषणात जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा संदर्भ देताना कवितेतील एक कडवं म्हटलं होतं. मात्र, भाजप समर्थकांकडून केवळ तेवढाच सोयीचा व्हिडिओ शेअर करत शरद पवारांनी हिंदू देवतांचा बाप काढल्याचा आरोप करण्यात आला. आता, या आरोपावर एनसीपीने संपूर्ण व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. तर, आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.