बायको मरून शेजारी पडली, हतबल पती काहीही करू शकला नाही... पोलीस आले तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 06:43 AM2023-08-06T06:43:38+5:302023-08-06T06:43:53+5:30
हृदय पिळवटून टाकणारी बोरिवलीतील घटना
- गौरी टेंबकर - कलगुटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सगळे आयुष्य एकमेकांसोबत घालवायच्या आणा-भाका घेतलेली आपली जीवनाची जोडीदार हृदयविकाराने दगावली. आपल्या शेजारीच तिचा मृतदेह पडलेला असताना त्या संवेदनाही त्यांच्या जोडीदाराला कळल्या नाहीत... असहाय्यपणे ते बायकोच्या मृतदेहाशेजारी अंथरुणावर पडून राहिले... शेजाऱ्यांना घरातून उग्र वास येऊ लागला तेव्हा पोलिसांना बोलावून दार उघडले... आतील दृश्य सगळ्यांनी पाहिले तेव्हा प्रत्येकाचे हृदय पिळवटून गेले... बोरिवलीतल्या राजेंद्रनगरमधील भूमी गार्डन इमारतीत हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला.
कायम अंथरुणाला खिळून असलेले ऐंशी वर्ष वयाचे भास्कर शेट्टी. चालत्या फिरत्या, घर सांभाळणाऱ्या, सोसायटीत सगळ्यांशी आपुलकीचे संबंध ठेवणाऱ्या ७८ वर्ष वयाच्या त्यांच्या पत्नी सुलोचना शेट्टी. त्यांची मुलगी रेश्मा आणि जावई बिरेन संघराज अमेरिकेत राहतात. आई-वडिलांसाठी त्यांनी घरी केअरटेकर ठेवलेला. मात्र, तो नीट काळजी घेत नाही म्हणून काही दिवसांपूर्वी त्याला काढून टाकले होते. मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना जी काही मदत लागेल ते देण्याचे काम पोलिस करतात. दर सात दिवसांनी ते एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देतात. कस्तुरबा पोलिस ठाण्याचे कर्मचारी शेट्टी दाम्पत्याच्या घरी जाऊन आले होते. त्यावेळी दोघेही व्यवस्थित होते.
पावसाळा असल्यामुळे सुलोचनाबाई सोसायटीत खाली आल्या नसतील, असे वाटल्याने कोणी फारशी विचारपूस केली नाही. मात्र, दोन दिवसांनंतर घरातून चाहूल येईनाशी झाली. उग्र वास येऊ लागला, तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला, तेव्हा समोरचे चित्र पाषाण हृदयालाही पाझर फोडणारे होते. निश्चेष्ट पडलेला सुलोचनाबाईंचा देह आणि विमनस्क अवस्थेत बाजूला त्यांचे पती... काळजाचे पाणी पाणी व्हावे, असे दृश्य पाहून पोलिसांच्याही डोळ्यातून आसवे वाहू लागली.
सुलोचना शेट्टी कमालीच्या उत्साही होत्या. नवरात्र असो की गणपती, सोसायटीच्या कार्यक्रमात भाग घ्यायच्या. आपल्या आजारी ८० वर्षीय पतीची आपुलकीने काळजीही घ्यायच्या.
आम्ही एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे सतत जात असतो. शेट्टी दाम्पत्यांच्या घरी आमचे कर्मचारी गेले होते. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. शवविच्छेदन अहवालात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आहे.
- अनिल आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कस्तुरबा पोलिस ठाणे.
शेजारचे गहिवरले...
सुलोचनाबाईंच्या शेजारी राहणाऱ्या रेश्मा नांदीवडेकर यांचा त्यांच्याशी दोन दशकांचा स्नेह. त्या दोघींची सोमवारची भेट अखेरची ठरली. पावसामुळे त्या इमारतीखाली येत नव्हत्या. त्यामुळे त्याचे कोणाला काही वाटले नाही.
दोन दिवस बोलणे होत नव्हते, म्हणून नांदिवडेकरांनी फोनवरून संपर्क साधला. फोन का उचलत नाहीत म्हणून त्या सुलोचनाबाईंच्या घरी गेल्या.
दरवाजा बंद होता. आतून वास येत होता. घाबरून त्यांनी कस्तुरबा पोलिसांना कळवले आणि अत्यंत वेदनादायी घटना समोर आली.
आम्ही एवढे का बिझी होतो... अशी अपराधी भावना बोलून दाखवताना नांदिवडेकर डोळ्यातून अश्रू ढाळत होत्या.
घटना कळताच मुलगी आणि जावई मुंबईत आले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी आणि जावई या सगळ्या प्रकारानंतर नि:शब्द होते.