शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील भाजपात; विकिपीडियावर झाली घोडचूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 07:34 AM2022-08-11T07:34:02+5:302022-08-11T07:34:07+5:30
एका मंत्र्याच्या पक्षाचे नाव तर ‘शिंदे गट’ हेच असल्याचेही दिसते.
- सागर सिरसाट
मुंबई : ‘शिंदे’ गट-भाजप आघाडी सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटाच्या काही मंत्र्यांबाबत भुवया उंचावणारे चित्र इंटरनेटवर दिसत आहे. जगप्रसिद्ध ऑनलाइन विश्वकोश मंच विकिपीडियाच्या संकेतस्थळावर शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांचा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याचे झळकत आहे. एका मंत्र्याच्या पक्षाचे नाव तर ‘शिंदे गट’ हेच असल्याचेही दिसते.
कोणत्या मंत्र्यांबद्दल, कधी बदल?
गुलाबराव पाटील : यांच्या पेजवरील माहिती १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.१० वाजता बदलण्यात आली आहे. त्यावर राजकीय पक्ष म्हणून भाजपचा उल्लेख आहे.
दादाजी भुसे : यांच्या पेजवरील माहिती शपथविधीच्याच दिवशी बदललेली आहे. तिथेही भाजप त्यांचा पक्ष असल्याचे दिसते. तथापि, प्रोफाईलच्या मुखपृष्ठावर शिवसेना लिहिलेले आहे.
उदय सामंत : यांच्या पेजवरील माहिती ५ ऑगस्ट रोजी ४.३७ वाजता बदलण्यात आली. तेही भाजपचे असल्याचे विकीपीडिया म्हणते.
संदिपान भुमरे : यांच्या पेजवरील माहितीही शपथविधीच्याच दिवशी बदलण्यात आली आहे. प्रोफाईलच्या मुखपृष्ठावर भाजप पक्ष दिसत आहे, तर आतमध्ये शिवसेना आहे.
संजय राठोड : यांच्या विकीपेजवरील माहिती शपथविधी दिवशीच अपडेट झाली असली तरी राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेचा उल्लेख कायम आहे.
शंभुराज देसाई : यांच्या पेजवर सर्वात वेगळी माहिती दिसतेय. प्रोफाईलच्या मुखपृष्ठावर शिवसेना असले तरी आतमध्ये मात्र राजकीय पक्ष ‘शिंदे गट’ असे नमूद आहे. ४ ऑगस्ट रोजी ९.४३ वाजता त्यांचे पेज अपडेट केलेले आहे.