Join us

अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील बंगल्यावरही दगडफेक, युवकांनी काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 7:27 PM

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

मुंबई - राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. औरंगाबादेत युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले. जाहीर माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे क्रांती चौकात दहन केले. तसेच काही कार्यकर्त्यांनी अब्दुल  सत्तार यांच्या हिमायतबाग येथील घरावर दगडफेक केली. दुसरीकडे मुंबईतील बंगल्याच्याही काचा फोडण्यात आल्या आहेत. 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. दरम्यान, औरंगाबादेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक आंदोलन करत क्रांती चौक येथे सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन ही करण्यात आले. तसेच काही कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या हिमायतबाग येथील निवासस्थानावर दगडफेक केली. तर, राज्यातील अनेक शहरांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील बंगल्यावरही कार्यकर्ते घुसले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली. काही कार्यकर्त्यांनी बंगल्यावर दगडफेक करत काच्या फोडल्या आहेत. 

सत्तारांचे आता सहन करणार नाही 

सिल्लोड येथील नागरिकांनी अब्दुल सत्तार यांचे खूप लाड केले. पण आता सहन होत नाही. मागेही त्यांनी जनतेला कुत्रा संबोधले होते. आता आपल्या बेताल वक्तव्याबाबत आधी खा. सुप्रिया सुळे यांची माफी मागावी. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर ते औरंगाबादचे आहेत आणि आम्हीही येथेच आहोत असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते निलेश राउत यांनी दिला

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.

टॅग्स :अब्दुल सत्तारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईसुप्रिया सुळे