साक्षीला अद्ययावत पाय मिळाला, एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण केला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:37 AM2022-06-06T11:37:16+5:302022-06-06T11:37:59+5:30

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून भागवला गेला साक्षीच्या रुग्णालयातील उपचाराचा संपूर्ण खर्च

The witness got an updated leg, Eknath Shinde fulfilled his promise | साक्षीला अद्ययावत पाय मिळाला, एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण केला

साक्षीला अद्ययावत पाय मिळाला, एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण केला

googlenewsNext

मुंबई - 'लहानग्या साक्षीचे धावपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अवश्य प्रयत्न करावेत त्यासाठी तिला लागेल ती सर्व मदत करू' असे उदगार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होतं ते साक्षीला नवीन अद्ययावत पाय बसवून देण्याचं. साक्षीची केईएम रुग्णालयात भेट देऊन तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च स्वीकारत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, रविवारी तिला नवीन पाय बसवून पुन्हा तिच्या पायावर उभ करत दिलेला आपला शब्द त्यांनी पूर्ण केला आहे.  

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात गतवर्षी झालेल्या प्रलयंकारी पावसात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवेळी आपला जीव धोक्यात घालून साक्षी दाभेकर या 14 वर्षांच्या मुलीने एका दोन महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवले होते. मात्र, भिंत अंगावर कोसळल्याने साक्षीच्या पायाला जबर जखमी झाली होती. यावर उपचार करण्यासाठी तिला तातडीने मुंबईतील 'केईएम' रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. साक्षीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांच्या खर्च कसा करायचा? असा प्रश्न तिच्या कुटूंबियाना पडला होता. 

साक्षी ही मुलगी धावपटु होती कब्बडी आणि खो-खो सारखे खेळ तालुकास्तरावर खेळत होती. पण तीला पाय गमवावा लागल्याने तिला कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं जातं होतं. त्यावेळी अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी तिची ही व्यथा लोकांसमोर आणली. त्यानंतर या बातम्यांची दखल घेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तिची केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच तिच्यावरील उपचारांचा सर्व खर्च डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचे जाहीर केले. तसेच साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींच शैक्षणिक पालकत्व देखील त्यांनी शिवसेनेच्या वतीने उचलत असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार आज साक्षीला मंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर बोलावून त्यांच्या समक्षच नवीन पाय बसवण्यात आला. याआधी केईएम रुग्णालयाने तिचा 'जयपूर फूट' बसवला होता. मात्र आता अधिक चांगल्या दर्जाचा पाय बसवण्यात आल्याने तिला चालणे, हालचाल करणे या गोष्टी अधिक चांगल्या रीतीने करता येणे शक्य होणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी डॉ. अंकुश शेठ यांच्या मदतीने हा पाय साक्षीला लावून देण्यात आला. 

यावेळी बोलताना साक्षीने हा नवीन पाय बसवल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. त्यासोबतच आता पुन्हा चांगल्या दर्जाचा पाय मिळाल्याने पुन्हा धावायला सुरुवात करून धावपटू बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींच शैक्षणिक पालकत्व देखील शिवसेनेने उचलले असल्याने त्यांच्या शिक्षणाला देखील लवकरच सुरुवात होईल. आज साक्षीला हा नवीन अद्ययावत पाय बसवला गेला असल्याने भविष्यात तिचे धावपटू होण्याचे स्वप्न ती नक्की पूर्ण करेल असा विश्वास मंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच दाभेकर भगिनींना लागेल ती सर्व मदत करण्याची  तयारी त्यांनी दर्शवली. 

दरम्यान, यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. अंकुश शेठ साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनी आणि त्यांचे आप्तेष्ट तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील सर्व प्रमुख वैद्यकीय सहाय्यक आवर्जून उपस्थित होते. 
 

 

Web Title: The witness got an updated leg, Eknath Shinde fulfilled his promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.