महिलेने पोटात लपविले १० कोटींचे कोकेन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:45 AM2024-09-23T09:45:51+5:302024-09-23T09:46:00+5:30
महिलेने पोटात लपवून आणलेल्या पावणे दहा कोटी रुपये किमतीच्या कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत.
मुंबई : ब्राझीलहून मुंबईत आलेल्या जॅकलिन माल्टेज टायगर (३६) या महिलेने पोटात लपवून आणलेल्या पावणे दहा कोटी रुपये किमतीच्या कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. टायगर हिने ब्राझीलच्या साओ पावलो विमानतळावरून मुंबईला येणारे विमान पकडले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिच्या अंगझडतीत काहीही संशयास्पद आढळले नाही. तिने पोटात अमली पदार्थ लपवल्याचा संशय आल्याने तिला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तिच्या पोटात कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्या काढल्या.
पैशांसाठी जोखीम
आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे आपण हे जोखमीचे काम करण्यास होकार दिल्याचा कबुलीजबाब ब्राझीलहून आलेल्या टायगर या आरोपी महिलेने चौकशीत दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिला अटक करण्यात आली असून या तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.