लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समुद्रात बुडणाऱ्या महिलेसाठी दोन अंमलदारानी समुद्रात उडी घेत तिला वाचवल्याची घटना मरीनड्राइव्ह येथे गुरुवारी घडली. स्वाती कांतीलाल कनानी (५९) असे महिलेचे नाव असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास स्वाती या २० फूट खोल समुद्रात कोसळल्या. महिला पाण्यात बुडत असल्याचे समजताच अंमलदार किरण ठाकरे आणि अमोल दहीफले यांनी स्वतःचा जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. जवळपास २० मिनिटे बचावकार्य सुरु होते. काहींनी मदतीसाठी रिंग, टायर, सुरक्षा दोरी पाठवली. अखेर, महिलेला बाहेर काढताच त्यांना तात्काळ जीटी रुग्णालयात दाखल केले.
माटुंगा येथील रहिवासी असलेल्या कनानी या अविवाहित असून मरीनड्राइव्ह येथे फिरण्यासाठी आल्या होत्या, त्यादरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या खाली कोसळल्या. हाय टाइडचा इशारा पोलिसांनी दिला होता. अशावेळी समुद्राच्या जवळ जाऊ नये याबाबत देखील पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, तरी देखील महिला तेथे गेली आणि तोल जाऊन समुद्रात पडली. पोलिसांची नजर त्यांच्यावर गेल्याने त्यांनी उंच लाटा असताना देखील समुद्रात उडी घेत त्यांना वाचवले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले.