मुंबई-अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील गोखले पूल खूप महत्त्वाचा पूल आहे.१९७५ साली बांधलेल्या या महत्त्वाच्या पूलाचा भाग कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता.तर हा पूल धोकादायक झाल्याने दि,७ नोव्हेंबर पासून हा पूल वाहतुकीस बंद केला होता.अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूलाच्या कामाला भर पावसात आज पुन्हा पालिका प्रशासनाने दिमखात सुरवात केली.
रेल्वेने पाडकाम केल्यावर पालिकेच्या पूल विभागाने या पूलाच्या कामाला सुरुवात केली होती.मात्र हरियाणाच्या अंबाला येथील फॅब्रिकेशन तयार करणाऱ्या कारखान्यात मुसळधार पावसाने २-३ फूट पाणी गेल्याने या कामाला ८-१० दिवस ब्रेक लागला होता.
काल रात्री ११ च्या सुमारास हरियाणावरून ६२ टन वजनाचे बेस गर्डर घेवून दोन ट्रक गोखले पूलाच्या ठिकाणी दाखल झाले.आणि पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.तर या ठिकाणी बेस गर्डर आल्याने ढोलकी वादकांनी ढोल ताशा वाजवत जोरदार स्वागत केले.
पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून सदर जड बेस गर्डर असणाऱ्या ट्रक चालकांना हार घालत आणि त्यांना पेढे देत त्यांच्या सत्कार केला अशी माहिती पालिकेचे उपायुक्त ( पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी लोकमतला दिली.आज पासून पुन्हा पुन्हा या पूलाच्या कामाला दिमाखात सुरुवात झाली अशी माहिती त्यांनी दिली.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारसू यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यां समवेत या पूलाच्या कामाची दि,६ जुलै रोजी या पूलाच्या कामाची पाहाणी केली होती.त्यावेळी दिवाळी पर्यंत या पूलाच्या तीन मार्गिका सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.त्यामुळे या पूलाचे काम आज पासून परत सुरू झाल्याने नियोजित वेळेत या पूलाचे काम पूर्ण होईल का? याकडे अंधेरीकरांचे लक्ष लागले आहे.