मुंबई : पूर्व-पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग मुसळधार पावसाने कोसळला. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.
हरयाणामधून ६२ टन वजनाचे बेस गर्डर दाखल झाल्यानंतर चक्क ढोल-ताशा वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांनी ६ जुलैला रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत या पुलाच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी दिवाळीपर्यंत या पुलाच्या तीन मार्गिका सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील गोखले पूल खूप महत्त्वाचा पूल आहे. १९७५ साली बांधलेल्या या महत्त्वाच्या पुलाचा भाग २ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता.
तर हा पूल धोकादायक झाल्याने ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीस बंद केला होता. आज गोखले पुलाच्या कामाला भर पावसात पालिका प्रशासनाने सुरुवात केली. त्यामुळे हा पूल आता लवकरच वाहतुकीस खुला होईल.
- रेल्वेने पाडकाम केल्यावर पालिकेच्या पूल विभागाने या पुलाच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र हरयाणाच्या अंबाला येथील फॅब्रिकेशन तयार करणाऱ्या कारखान्यात मुसळधार पावसाने पाणी गेल्याने या कामाला दहा दिवसांचा ब्रेक लागला होता. काल रात्री हरयाणावरून ६२ टन वजनाचे बेस गर्डर घेऊन दोन ट्रक गोखले पुलाच्या ठिकाणी दाखल झालेत.- पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून बेस गर्डर असणाऱ्या ट्रक चालकांना हार घालत आणि पेढे देत त्यांच्या सत्कार केला, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी ‘लोकमत’ला दिली.