मुंबई : म्हाडाच्या वतीने मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यानुसार ना. म. जोशी मार्ग, वरळी येथील जांभोरी आणि दादर येथील नायगावमधील बीडीडीच्या चाळीच्या कामांनी वेग पकडला आहे. मात्र अद्यापही रहिवाशांमध्ये पुनर्विकासाबाबत संभ्रम असून, रहिवाशांच्या मनामधील गैरसमज दूर व्हावेत आणि त्यांना प्रकल्पाविषयी अद्ययावत माहिती मिळावी म्हणून म्हाडा सरसावली आहे.
म्हाडातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत उद्या सादरीकरण करण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बीडीडी चाळींतील भाडेकरू, रहिवासी यांना माहिती देण्याच्या उद्देशाने १२ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळीतील जांभोरी मैदान येथे सादरीकरण केले जाणार आहे. भाडेकरू, रहिवाशांनी सादरीकरणाला उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई मंडळाने केले आहे.